नवी दिल्ली – केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकर्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला चार महिने पूर्ण झाल्याबद्दल आता शेतकरी संघटनांनी २६ मार्चला भारत बंदचं आवाहन केलं आहे. व्यापारी संघटना आणि शेतकरी मिळून १५ मार्चला पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीविरोधात निदर्शनं करणार असल्याचं संयुक्त किसान मोर्चाचे नेते बुटा सिंग बुर्जगिल यांनी सांगितलं. भारत बंद आंदोलनही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत शांततेत करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. १९ मार्चला बाजर समिती वाचवा-शेती वाचवा दिवस साजरा करणार असल्याचीही त्यांनी माहिती दिली.
२६ नोव्हेंबरपासून शेतकर्यांचे आंदोलन
गेल्या वर्षीच्या २६ नोव्हेंबरला पंजाब आणि हरियाणातील शेतकर्यांनी दिल्लीकडे कूच केली होती. पंजाब आणि हरियाणाच्या सीमेवर गोंधळ उडाला होता. सिंघू सीमेवर संघर्ष झाल्यानंतरही शेतकर्यांनी मार्गक्रमण केलं. हरियाणा पोलिस आणि मोठ्या आव्हानांचा सामना करून शेतकरी सिंघू सीमेवर पोहोचले.
चर्चेच्या ११ फेर्या
एक डिसेंबरपासून सरकार आणि शेतकर्यांदरम्यान चर्चा सुरू झाली. जवळपास शेतकर्यांच्या ४० संघटनांचे प्रतिनिधी आणि सरकारदरम्यान एका मागून एक चर्चेच्या ११ फेर्या झाल्या. सरकारकडून वेगवेगळे प्रस्ताव दिल्यानंतरही शेतकरी संघटना तीन कायदे मागे घेण्यावर आणि किमान आधारभूत किंमतीवर कायदा बनवण्याच्या मागणीवर अडून राहिल्या. कृषी कायदे दीड वर्षासाठी स्थगित करण्याचा प्रस्तावसुद्धा शेतकरी संघटनांनी फेटाळला.