नवी दिल्ली/मुंबई – कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या देशव्यापी भारत बंदला देशभरात मोठा प्रतिसाद मिळाला आहे. महाराष्ट्रात या बंदला उत्स्फुर्त प्रतिसाद पहायला मिळाला. अनेक स्तरावरुन या बंदला पाठिंबा मिळाला. राजकीय पक्ष, संस्था, संघटनांसह अनेक सेलिब्रेटींनी बंदला समर्थन दिले. महाराष्ट्रातील बहुतांश कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होत्या. त्याशिवाय अनेक तालुक्यांनी सर्वपक्षीय बैठक घेऊन तालुका व शहर बंदचे आवाहन केले. त्यास चांगला प्रतिसाद मिळाला. अनेत ठिकाणी आठवडे बाजारही भरविण्यात आले नाहीत. तालुका स्तरावरील बाजारपेठा जवळपास पूर्णपणे बंद होत्या. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु होत्या. ग्रामीण भागात बंदचा प्रभाव मोठा होता. बंद दरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिस व सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क राहिल्या.
दरम्यान, आंदोलक शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेची फेरी उद्या (९ डिसेंबर) पुन्हा होणार आहे. तोपर्यंत राजधानी दिल्लीतील आंदोलन सुरूच राहणार आहे. तर, विरोधी पक्षांनीही एकजूट करुन याप्रकरणी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची उद्या सायंकाळी भेट घेण्याचे निश्चित केले आहे.