चांदवड –
उभ्या आयुष्याची परवड
रोजच कुस बदलून रडते
बापाच्या फाटलेल्या कोपरीत
अजूनही जुनीच नोट सापडते…
पाच वर्षांची चिमुकली अवनी मोठ्या आत्मविश्वासाने कविता सादर करीत होती. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी शांततेने कविता ऐकत होते. कविता संपताच राजू शेट्टी यांनी अवनीचा मुका घेऊन तिचे भरभरून कौतुक केले. राजू शेट्टी नाशिक जिल्ह्याच्या दौर्यावर आले असताना ओझर येथील दहावा मैल येथे पुस्तकांची हॉटेल म्हणून प्रसिद्ध असलेल्या रिलॅक्स कॉर्नर येथे काही काळासाठी थांबले. त्यावेळी अक्षरबंध संस्थेचे प्रकाशक प्रवीण जोंधळे यांची कन्या अवनीने आपल्या वडिलांनी परवड कवितेच्या माध्यमातून शेतकर्याची मांडलेली व्यथा शेट्टी यांच्यासमोरच मांडली.
ही कविता ऐकून शेट्टी भारावून गेले. त्यावेळी त्यांनी सांगितले की एका चिमुकलीला शेतकर्याची परवड समजली, पण आपल्या मायबाप सरकारला कष्टकरी शेतकर्याची परवड अजून काही समजली नाही. एका बाजूला भारत महासत्तेचे स्वप्न पाहतो आहे मात्र देश स्वतंत्र होऊन ७३ वर्षे झाली तरी येथील शेतकर्यांची परवड अजून थांबली नाही. मंदिरे उघडण्यासाठी आंदोलने होत आहेत. मात्र कोरोनामुळे गेल्या सहा महिन्यांपासून कष्टकरी, मजुरांची, छोट्या व्यावसायिकांची परवडत होत आहे, सर्व काही बंद असल्यामुळे त्यांच्या रोजच्या भाकरीचा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र त्यांच्यासाठी कोणीही आंदोलने करताना दिसत नाही. कष्टकरी शेतकर्याची परवड अवनीप्रमाणे ज्यावेळी देशातील सर्व घटकांना समजेल, त्यावेळी खर्या शेतकरी सुखी होईल, असे शेट्टी यांनी शेवटी सांगत निरोप घेतला.