नाशिक – शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक रोखणारा नाशिकचा पॅटर्न राज्यभर राबविण्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे. नाशिकचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी नाशिक पॅटर्न सुरू केला आहे.
शेतकऱ्यांना शेतपिकांच्या उत्पादनाच्या मूल्याचे पैसे धनादेशाच्या स्वरुपात व्यापाऱ्यांकडून दिले जातात. मात्र, हा धनादेश नंतर बँकेत वठत नाही. त्यामुळे शेतकऱ्याला विहित वेळेत पैसे मिळत नाहीत. यातून मानसिक व आर्थिक मोठा त्रास शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. तसेच, अनेक व्यापारी हे पैसे देण्यास टाळाटाळ करतात, पळून जातात अशा असंख्य तक्रारी आहेत. डॉ. दिघावकर यांनी या सर्व प्रकाराची गंभीर दखल घेत व्यापारी व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची जोरदार कार्यवाही सुरू केली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे आणि शेतकऱ्यांना फसविणाऱ्यांचे धाबे दणाणले. गेल्या काही महिन्यात नाशिक जिल्ह्यासह उत्तर महाराष्ट्रात अनेक गुन्हे दाखल झाले. तर अनेक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांना पैसे तत्काळ दिल्याच्या घटना घडल्या आहेत. याची दखल राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेतली आहे. म्हणूनच शेतकरी हिताचा हा अनोखा पॅटर्न राज्यभर राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानिमित्ताने नाशिकचे सुपूत्र असलेल्या डॉ. दिघावकर यांच्या या कार्याची व्याप्ती आता राज्यभर होणार आहे.