निफाड – केंद्र शासनाने जाणीवपूर्वक लागू केलेली कांदा निर्यातबंदी हटविण्यात यावी यासाठी शेतकरी संघर्ष संघटनेच्यावतीने निफाड चौफुलीवर गनिमी कावा करत चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
संघटनेने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “करोना या संकटात पिजलेल्या शेतकऱ्यांना दोन पैसे मिळतील अशी आशा होती मात्र केंद्र सरकारने अचानक कांदा निर्यातबंदीचा नारा दिल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेला त्यामुळे संतप्त झालेल्या कांदा उत्पादक शेतकऱयांनी शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष इंजि. हंसराज वडघुले, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष नाना बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली निफाड चौफुलीवर चक्काजाम आंदोलन छेडण्यात आले.
नरेंद्र मोदी हाय हाय, केंद्र सरकारचा निषेध असो, कांदा निर्यात बंदी हटवलीच पाहिजे, या सरकारचे करायचे काय,खाली तंगड्या वरती पाय अशा घोषणा देत निफाड चौफुली परिसर घोषणांनी दणाणून गेला. मोर्चाचे रूपांतर छोट्या सभेत झाले. त्यात वडगुले यांनी केंद्र शासनावर आसूड ओढला. यावेळी नाना बच्छाव, जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटोळे, जिल्हा सरचिटणीस तानाजी वावधने, युवा आघाडी जिल्हा कार्याध्यक्ष नितिन कोरडे निफाड तालुका अध्यक्ष सुनिलभाऊ कापसे निफाड शहर अध्यक्ष अनिल वडघुले, तालुका उपाध्यक्ष शरद चकोर, राम राजोळे, गणेश दाभाडे ,सचिन राजोळे अनेक शेतकरी तसेच संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.