नाशिक – येवला तालुक्यातील शेतकरी दाम्पत्याने त्यांची कौटुंबिक व्यथा सांगण्यासाठी पोलिस अधिक्षक सचिन पाटील फोन केला. त्यांनी त्याची गंभीर दखल घेतली अन पथकाला कारवाईस धाडले. ही कारवाई पूर्ण होताच पोलिस अधिक्षकांनी येवला तालुका पोलिस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेच्या ६ पोलिस कर्मचाऱ्यांची तडकाफडकी बदली केली आहे. तर २ पोलिसांचे निलंबन केले आहे. या कारवाईमुळे नाशिक ग्रामीण पोलिस दलात मोठीच खळबळ उडाली आहे.
येवला तालुक्यातील एका शेतकरी दाम्पत्याने पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांना फोन केला. मुलगा दारुच्या आहारी गेला असून गावाच्या परिसरात अवैध धंदे बिनबोभाट सुरू आहेत. त्यामुळे मुलगा कुटुंबात फार लक्ष देत नसल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकाराची गंभीर दखल घेण्यात आली. आणि विशेष पथकाची नियुक्ती करुन येवला तालुक्यातील अवैध मद्य विक्री करणाऱ्यांवर छापा टाकण्यात आला. याप्रकरणी येवला तालुका पोलीस स्टेशनमध्ये संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला. स्थानिक पातळीवर काहीच कारवाई होत नसल्याची बाबही यानिमित्ताने पोलिस अधिक्षकांच्या निदर्शनास आली. म्हणूनच त्यांनी येवला पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अनिल भवारी यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी हवालदार शांताराम घुगे, पोलीस नाईक रावसाहेब कांबळे, शिपाई प्रविण काकड, भाऊसाहेब टिळे, विशाल आव्हाड व अन्य एक कर्मचारी यांची तातडीने ग्रामीण पोलिसांच्या नियंत्रण कक्षात बदली केली आहे. तर, या प्रकरणी अंमलदार जमादार कैलास जाधव आणि पोलीस नाईक योगेश पाटोळे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांसह ग्रामीण पोलिस दलाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.
अभिनंदन .गरीव दाम्पत्याला न्याय दिल्याबद्दल अभिनंदन.