नवी दिल्ली – शेतकरी आंदोलनात सक्रिय सहभागी असलेल्या भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आंदोलन दीर्घकाळ चालणार असल्याचं भाकित केलं असून त्यांच्या रणनीतीबाबत खुलासा केला आहे. प्रत्येक गावातून एक ट्रॅक्टर, १५ लोक १० दिवस आंदोलनस्थळी राहतील. याच रणनीतीनुसार आंदोलन सुरूच राहाणार आहे. केंद्र सरकार आंदोलनाला दीर्घकाळ लांबविण्याचा प्रयत्न करत आहे. यावर तोडगा काढण्याची त्यांना इच्छा नाही. त्यामुळे शेतकरीसुद्धा आंदोलन दीर्घकाळ चालविण्यासाठी तयार आहे.
पोलिसांवर चौफेर टीका
गाझीपूर सीमेवर मोठे मोठे लोखंडी खिळे लावल्यानंतर दिल्ली पोलिसांवर चौतर्फा टीका झाली. या कृतीमुळे दिल्ली पोलिस नागरिकांच्या निशाण्यावर आले. सोशल मीडियासह अनेक ठिकाणी या कृतीविरोधात आवाज उठवला गेला. फेसबुक, ट्विटरवर या खिळ्यांचे छायाचित्र वेगवेगळ्या पद्धतीनं व्हायरल करण्यात आली. शेवटी चौतर्फा टीका झेललेल्या पोलिसांनी गुरुवारी तत्काळ खिळे हटविण्यास सुरुवात केली. त्यादरम्यान तेथे एकही पोलिस उपस्थित नव्हता. खिळे हटवल्यानंतरही पोलिसांना उत्तर देणं मुश्कील झालं होतं.
रस्त्यात काटे अंथरले
प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर आंदोलनकर्ते पुन्हा ट्रॅक्टर दिल्लीत आणू नये म्हणून, दिल्लीच्या सीमांवर पोलिसांनी रस्त्यावर खिळे लावले होते. सोशल मीडियावर पोलिसांनी रस्त्यावर काटे अंथरल्याच्या पोस्ट व्हायरल झाल्या. आंदोलनकर्त्यांसाठी जरी खिळे लावले असले तरी रस्ता सामान्य नागरिकांसाठीसुद्धा आहे, असं काही नागरिकांनी सोशल मीडियावर लिहिलं होतं.