नवी दिल्ली ः कॅनडा इथली संस्था पोएटिक जस्टिस फाउंडेशननं शेतकरी आंदोलनाचा प्रचार जगभरात करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. कॅनडाच्या बाहेरील अनेक राजकीय नेते, कार्यकर्त्यांनी शेतकरी आंदोलनाचं समर्थन करत आहेत, असं द प्रिंट वृत्तपत्राच्या माहितीनुसार ऑप इंडियानं म्हटलं आहे.
स्काइरॉकेट नावाच्या एका पीआर कंपनीनं पॉपस्टार रिहाना यांना शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट करण्यासाठी १८ कोटी रुपये दिले असल्याचं द प्रिंटनं म्हटलं आहे. पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्ग हिला दिलेले टुलकिट स्पून फिडिंग करण्यासाठी दिले गेले होते. देशात अशांतता पसरवण्यासाठी असे प्रकार मोठ्या प्रमाणात केले जात होते, असंही द प्रिंटला सूत्रांनी सांगितलं.
मो धालीवाल हे पोएटिक जस्टिस फाउंडेशनचे संचालक आहेत. अनिता लाल यासुद्धा पोएटिक जस्टिस फाउंडेशनच्या सहसंस्थापक आहेत. या संघटनेनं ग्रेटा थनबर्गला टुलकिट उपलब्ध करून दिलं होतं. शेतकरी आंदोलनाबाबत का बोललं जात नाही, असं पॉपस्टार रिहानानं ट्विट केलं होतं. त्यानंतर ग्रेटा थनबर्ग आणि पॉर्नस्टार मिया खलिफा यांनी सुद्धा शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट केलं होतं. ग्रेटा थनबर्गनं टुलकिट चुकीनं सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर या गोष्टींचा उलगडा झाला. नोहेंबर २०२० पासून भारताविरुद्ध षडयंत्र रचण्यास सुरुवात झाली होती, अशी माहिती त्यात होती. त्यानंतर देशातील अनेक सेलिब्रिटींनी या षडयंत्राविरोधात एकत्र येत विरोध केला होता. यात सचिन तेंडुलकर, कंगना राणावत, लता मंगेशकर, अक्षय कुमार यांचा समावेश होता.
या वृत्ताच्या आधारवार कंगना राणावत हिनेसुद्धा ट्विट केलं आहे. इतके कमी. इतक्या कमी पैशात तर मी मित्रांना भेट देऊ शकते, किती स्वस्त आहेत हे सगळे यार हा हा हा… असं तिनं ट्विट केलं होतं. फोर्ब्स यादी हीच सर्वात मोठा घोटाळा आहे. त्यांच्याकडे कोणत्याही कलाकाराच्या आर्थिक व्यवहारांची माहिती नसते. मी खोटं बोलत असेल तर फोर्ब्स माझ्याविरोधात मानहानीचा दावा करू शकते, असंही कंगनानं म्हटलं आहे.