नवी दिल्ली – शेतमालाची हमीभावाने खरेदी सुरूच राहील; अशी ग्वाही केंद्र सरकारने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना पुन्हा दिली आहे. शेतकऱ्यांच्या सर्व अडचणी सोडवण्याचे आश्वासन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी शेतकऱ्यांसोबत चर्चेच्या पाचव्या फेरीत दिले. मात्र, तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली. अखेर पाचवी बैठकही निष्फळ ठरली. त्यामुळे आता चर्चेची सहावी फेरी येत्या ९ डिसेंबराल होणार आहे.
शेतकरी प्रतिनिधींनी कृषी कायद्यांच्या घटनात्मक वैधतेबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर सरकारने या कायद्यांच्या सर्व घटनात्मक तरतूदी स्पष्ट केल्या. बाजार समित्या, खाजगी बाजार आणि मार्केट यार्ड यांच्यात समन्वय असावा तसेच बाजार समित्यांबाहेर केलेल्या व्यवहारांचीही योग्य नोंदणी होणे आवश्यक आहे असे मत शेतकरी प्रतिनिधींनी व्यक्त केले. शेतकरी संघटनांनी आपले विचार व्यक्त केल्याबद्दल तोमर यांनी आभार मानले आणि सरकार नेहमीच त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यास तयार आहे असे आश्वासन दिले. अखेर ही बैठकही निष्फळ ठरली. शेतकऱ्यांनी आंदोलन कायम ठेवण्याचा निश्चय केला आहे. अखेर येत्या ९ डिसेंबरला सरकारसमवेत पुन्हा बैठक होणार आहे. त्यावेळी तरी तोडगा निघून आंदोलन मागे घेतले जाणार का याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या ८ डिसेंबरच्या भारत बंदला अनेक भागातून पाठिंबा जाहिर केला जात आहे.