नवी दिल्ली ः केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकरी संघटनांकडून गुरुवारी दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत रेल रोको आंदोलन केले जाणार आहे. दरम्यान रेल रोकोबाबत शेतकरी संघटनांमध्ये मतभेद समोर आले असून, सांकेतिक रेल रोको करण्यास सांगण्यात येत आहे. तरीही पोलिस आणि रेल्वे प्रशासनाकडून व्यापक तयारी केली जात आहे. दिल्लीच्या सीमांवरील सिंघू, टिकरी आणि इतर ठिकाणी सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.
भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत म्हणाले की, स्थानिक लोक आपापल्या भागात रेल्वे रोखणार आहेत. सांकेतिक रूपात रेल्वे थांबवण्यात येणार आहेत. तसंच इंजिनवर फुलांचा हार घातला जाईल आणि रेल्वेचालकांना फूल दिले जातील. प्रवाशांना पाणी वाटप केले जाईल. बंद रेल्वे सुरू करण्याचा रेल रोकोचा उद्देश आहे, असं त्यांनी सांगितलं. यूपी सीमेवरील आंदोलनस्थळावरील कोणताही व्यक्ती या आंदोलनात सहभागी होणार नाहीत.
कुटुंबाला घेऊन सहभागी व्हा
किसान मजदूर संघर्ष कमिटीनं पंजाबमध्ये ३२ ठिकाणी रेल रोकोची घोषणा केली आहे. सिंघू सीमेवर कमिटीचे अध्यक्ष सतनाम सिंह पन्नू यांनी आंदोलनतर्त्यांना सांगितलं की, पंजाबमध्ये ३२ ठिकाणी रेल रोको केले जाणार आहे. आपल्या कुटुंबीयांसह ठिकठिकाणी रेल रोकोसाठी पोहोचा, हे आपल्या गावांमध्ये दूरध्वनी करून कळवा, असं त्यांनी आवाहन केलं. जे स्थानक आपल्या भागाजवळ असेल तिथं आवश्य जा. आगामी काळात आंदोलन अधिक तीव्र केले जाणार आहे, असं पन्नू यांनी स्पष्ट केलं. २५ फेब्रुवारीला तरणतारण इथं सभा होणार आहे. नंतर कपूरथला, जारंधर, मोघा आदी ठिकाणीही सभा होणार आहेत.
२० हजार अतिरिक्त जवान तैनात
रेल्वे स्थानकं आणि रेल्वे रूळांवरील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे. रेल्वे सुरक्षा विशेष दलाचे (आरपीएसएफ) जवाळपास २० हजार अतिरिक्त जवान तैनात केले आहेत. गरज पडल्यास परिणाम झालेल्या भागात रेल्वेसेवा बंद केली जाईल. मोठ्या रेल्वे स्थानकांवर रेल रोकोचा प्रयत्न केला जाणार आहे.