नवी दिल्ली – प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मोर्चाद्वारे केंद्र सरकारला घेरणाऱ्या शेतकरी आंदोलकांनी येत्या १ फेब्रुवारीला थेट संसदेवर धडक देण्याची रणनिती आखली आहे. केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे.
पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील हजारो शेतकरी राजधानी दिल्लीच्या सीमेवर गेल्या ६० दिवासंपासून आंदोलन करीत आहेत. उद्या प्रजासत्ताक दिनाला हे सर्व शेतकरी ट्रॅक्टर मोर्चाद्वारे आपले आंदोलन तीव्र करणार आहेत. संसदेचे अधिवेशन येत्या २९ जानेवारीपासून सुरू होत असल्याने येत्या १ फेब्रुवारी रोजी शेतकरी संसदेवर पायी मोर्चा काढणार असल्याचे शेतकरी नेते दर्शनपाल सिंह यांनी सांगितले आहे. आतापर्यंत आंदोलक शेतकरी आणि सरकार यांच्यात चर्चेच्या ११ फेऱ्या झाल्या आहेत. तरीही तोडगा निघालेला नाही.