मालेगाव – ऐतिहासिक आणि दीर्घ परंपरा असलेली बकरी ईद मालेगाव शहरात अत्यंत शांततेत आणि घराघरातच साजरी करण्यात आली. विशेष म्हणजे, शहरातील मैदान ओस पडल्याचे पहायला मिळाले. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर झालेला हा बदल विशेष चर्चेचा ठरला.
शहरात बकरी-ईद सण शांततेत पार पडला. मालेगाव येथे पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांचे मार्गदर्शनाखाली वेळोवेळी बकरी ईद सणानिमत्ताने शहरातील प्रतिष्ठित नागरिक, शांतता समिती सदस्य, प्रशासकीय अधिकारी यांच्या बैठका घेण्यात आल्या होत्या. ईद निमित्ताने काेणीही रस्त्यावर येणार नाही व आपापल्या घरीच नमाजपठण करून घरीच कुर्बानीचा कार्यक्रम करावा आणि सण शांततेत साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले. ईदनिमित्ताने पोलीस प्रशासनास मदत करण्यासाठी विविध मौलाना यांच्यामार्फत नागरिकांना व्हिडिओद्वारें सूचना देण्यात आल्या. या आवाहनास मालेगावकरांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळेच गेल्या वर्षी गजबजलेले मैदान यावेळी मात्र ओस पडल्याचे दिसून आले. पोलीस अधीक्षक डॉ. सिंह यांनी सर्व मालेगाव शहरातील नागरिकांना बकरी ईद सणानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. तसेच, प्रतिसादाबद्दल त्यांनी मालेगावकरांचे आभार मानले. ईदनिमित्त रविवारी आणि सोमवारी होणारे कार्यक्रमही घरीच साजरे करावे, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान, मालेगाव शहरातील या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सोशल मीडियात विशेष चर्चा होत आहे. कोरोना काळात खबरदारीसाठी नागरिकांनी घरातच नमाज अदा केल्याचे पाहायला मिळाले.