मुंबई महापालिकेला ‘आप’ चा सवाल
मुंबई – बृहन्मुंबई महापालिकेतर्फे मुंबईतील नागरिकांना दरवर्षी फक्त आश्वासनांची बोळवण केली जाते. पावसाळ्यात सकल भागात साचणाऱ्या पाण्याला पंपिंग द्वारे बाहेर काढण्यासाठी दर वर्षी शेकडो कोटींचे बजट असून देखील 2 दिवस पडणाऱ्या पावसाने मुंबई ची तुंबई झाली आहे. महापालिकेने केलेले सर्व दावे यावेळी फोल ठरले आहेत. एवढे पैसे खर्च करून देखील वर्षानुवर्षे हीच परिस्थिती राहण्यामागे महापालिकेचा गैरकारभारच असल्याचा आरोप आम आदमी पार्टी तर्फे करण्यात आला आहे.
मुंबई महापालिका निवडणूक प्रचार समितीच्या अध्यक्षा तथा राष्ट्रीय प्रवक्त्या प्रीती शर्मा-मेनन म्हणाल्या की, “पावसाचे पाणी पंपिंग स्टेशनद्वारे पुन्हा समुद्रात सोडण्याची योजना होती. परंतु, करोडो रुपये खर्च करून देखील मुंबई महापालिका हे काम करण्यास अपयशी ठरली आहे.”
‘आप’चे राज्य सह-संयोजक किशोर मंध्यान म्हणाले की, ” २००५ च्या प्रलयानंतर अनेक आश्वासने महापालिकेने दिलीत. महापालिकेकडे पैशांची कमी नसून इच्छाशक्तीची कमी आहे. पावसाळ्यात तुंबणाऱ्या पाण्यामुळे मलेरिया व डेंगू सारखे रोग होण्याची शक्यता आहे. एस व्ही रोडवर याही वर्षी पाणी तुंबले आहे. महापालिकेने या बाबतीत कोणतीच उपाययोजना केली नसल्याचे यावरून स्पष्ट दिसत आहे.”
राष्ट्रीय सह-सचिव रूबेन मास्करेहनस म्हणाले की, ” बृहन्मुंबई स्ट्रोम वॉटर ड्रेन हा प्रकल्प गेली अनेक वर्षे अपूर्ण आहे. पावसाळ्यातील पाण्याचे नियोजन करण्यासाठी १०६२ कोटी इतका फंड आतापर्यंत उपलब्ध केला गेला आहे. हे पैसे नेमके कुठे खर्च झाले याची चौकशी झाली पाहिजे”
राज्य सचिव धनंजय शिंदे म्हणाले की, “कोरोनामुळे अडचणीत सापडलेल्या मुंबईकरांना आता तुंबलेल्या रस्त्यांचा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्याच्या पाण्याचे नियोजन करण्यास महापालिका याही वर्षी अपयशी ठरली आहे”