नाशिक – आर्थिक अडचणीत असलेल्या कुटुंबांसाठी आर्थिक मदत म्हणून सुलभ मासिक हफ्त्यांची सुविधा असलेली शिक्षण कर्ज योजना विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल्सतर्फे सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत प्रत्येक कुटुंबाला जास्तीत जास्त २ कर्जे घेता येणार आहेत. कर्जाची रक्कम जास्तीत जास्त पाच लाख रुपयांपर्यंत असू शकेल असे विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल्सने स्पष्ट केले आहे.
कोरोनाकाळात विद्यार्थ्यांकडून फी घेवू नये असे सरकारने स्पष्ट केले असता स्कूलने ही योजना सुरू केली आहे. यात प्रत्येक विद्यार्थ्यामागे २.५ लाख रुपये आणि कर्ज परतफेडीचा कालावधी २७ महिन्यांचा असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांची फी भरणे बाकी असेल त्यांच्यासाठी हे कर्ज व्याज न आकारता दिले जाणार आहे.
व्याजाच्या संपूर्ण १००% रकमेवर ३० सप्टेंबर २०२० पर्यंत विबग्योरकडून सबसिडी दिली जाईल असे स्पष्ट करण्यात आले आहे. “सध्याच्या साथीच्या काळात ज्यांचे पालक आर्थिक अडचणीत आहेत अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी नवनवीन गोष्टी अंमलात आणल्या जात आहेत व त्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. लॉकडाउनमध्ये देखील शिक्षणात खंड पडू नये यासाठी आव्हानात्मक परिस्थितीत एकमेकांची मदत केली जावी हा उद्देश ठेवून काम करत आहोत. पालकांच्या समस्या समजून घेतल्या असून मदत म्हणून सुलभ मासिक हफ्त्यांची सोय असलेली शिक्षण कर्ज योजना सादर केली आहे. या कर्जावर कोणतेही व्याज आकारले जाणार नाही, या कर्जातून शिक्षणासाठीचे सर्व खर्च पूर्ण करता येतील” असे मत विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल्सचे चीफ मार्केटिंग ऑफिसर पेशवा आचार्य यांनी व्यक्त केले आहे.
सुलभ मासिक हफ्त्यांची सोय असलेली शिक्षण कर्ज योजना मुंबई, पुणे, नाशिक आणि वडोदरा येथे लागु करण्यात आली आहे. कर्जाचा कालावधी २७ महिन्यांचा आहे. त्याचप्रमाणे व्याजाच्या निश्चित रकमेव्यतिरिक्त कर्जाची मूळ रक्कम किंवा इतर कोणत्याही रकमेवर उशिराने भरल्या जाणाऱ्या कोणत्याही व्याज, दंड, दंडात्मक व्याज यासाठी कोणत्याही प्रकारे, कोणत्याही परिस्थितीत विबग्योर जबाबदार असणार नाही असे देखील नमूद करण्यात आले आहे.
मार्च २०२० मध्ये विबग्योर ग्रुप ऑफ स्कूल्सने कोविड-१९ साथीमुळे आर्थिक अडचणीत असलेल्या पालकांसाठी (नोकरदार आणि व्यावसायिक) आर्थिक मदत म्हणून एड्युब्रिज स्कॉलरशिप प्रोग्राम (फी माफी शिष्यवृत्ती योजना) सुरु केली होती. ३००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त २ तिमाहींची फी माफी (एड्युब्रिज स्कॉलरशिप) याआधीच मंजूर करण्यात आली आहे. या आव्हानात्मक काळात देखील मुलांचे शिक्षण सुरु ठेवता यावे यासाठी पालकांना मदत म्हणून मासिक हफ्ते व ऑनलाईन पेमेंट असे पर्याय देखील शाळेने उपलब्ध करून दिले आहेत.