नाशिक – केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या रस्ते बांधणी प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. त्यात प्रामुख्याने सुरत-नाशिक-अहमदनगर-चेन्नई या ग्रीन फिल्ड महामार्गाचाही समावेश आहे. यामुळे उत्तरेकडील वाहनांचा लोंढा मुंबईला न जाता दक्षिणेला जाईल. त्यामुळे उत्तर दक्षिणेकडील जिल्ह्यांची वाहतूक वेगाने होण्यास मदत मिळणार आहे, अशी माहिती खासदार डॉ. भारती पवार यांनी दिली आहे.
या महामार्गामुळे सुरगाणा, पेठ, दिंडोरी, निफाड या दिंडोरी लोकसभा मतदार संघातील बहुतांशीआदिवासी पट्ट्यातील क्षेत्र येत असून तेथील आदिवासी भागाचाही विकास होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा डॉ. पवार यांनी व्यक्त केली आहे. या महामार्गामुळे नाशिक जिल्ह्यातील तरुणांना रोजगार मोठ्या प्रमाणावर उपलब्ध तर होणारच आहे तर कांदा, द्राक्ष व अन्य शेतमाल उत्पादक शेतकरी, व्यापारी यांनाही मोठा फायदा होणार आहे. ही वाहतूक अधिक जलद होणार असल्याने वेळेची व इंधनाचीही बचत होणार आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघात या महामार्गामुळे रोजगाराच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत, असेही पवार यांनी म्हटले आहे.