मुंबई – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लॉकडाऊन दरम्यान ग्रंथालये व वाचनालये बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र अनलॉकचा पाचवा टप्पा आला तरी ग्रंथालये कधी उघडणार याची प्रतीक्षा वाचकांना होती. याबाबत साकारात्म बाब पुढे आली असून ग्रंथालये सुरु करण्यासंदर्भात येत्या दोन दिवसात मार्गदर्शक तत्व जाहीर करण्यात येतील अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. राज्यातील ग्रंथालये आणि वाचनालये कधी सुरु होणार यावरील प्रश्नचिन्ह अखेरीस दूर झाले आहे. येत्या दोन दिवसात ग्रंथालये सुरु करण्याबाबत नोटिफिकेशन जाहीर करण्यात येईल असे सामंत यांनी सांगितले. यासंबंधी ग्रंथालये आणि वाचनालयाचे समन्वयक तसेच विश्वस्तांनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी राज ठाकरे यांनी उदय सामंत यांच्याशी चर्चा केली असता येत्या दोन दिवसात नोटीफिकेशन जाहीर करण्याचे आश्वासन सामंत यांनी दिले आहे.