ढेपाळलेली आरोग्यव्यवस्था
नाशिकमधील कोरोना स्थिती म्हणजे ढेपाळलेली आरोग्यव्यवस्था असेच म्हणावे लागेल. ऑक्सिजनचा तुटवडा, बेड मिळत नसल्याच्या तक्रारी, आरोग्य कर्मचाऱ्यांची कमी, धूळखात पडलेले व्हेंटिलेटर आणि बेड अशा अनेकविध बाबींमुळे नाशिकमधील स्थिती हाताबाहेर जाते की काय, अशी भीती नाशिककरांना वाटते आहे.
- गौतम संचेती
(लेखक इंडिया दर्पण लाईव्हचे संपादक आहेत)
आपल्या वडिलांना गमावणा-या रश्मी पवार यांनी आपबिती सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडल्यानंतर ती व्हायरल झाली आणि एकूणच आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे निघाले. रश्मीने किमान आपले मन मोकळे करण्याचे धैर्य दाखवले. पण, अनेक जण तर ते बोलू सुद्धा शकत नाहीत. त्यामुळे सर्व सुरळीत चालू आहे, प्रशासन दक्ष आहे, लोकप्रतिनिधींचे सर्व यंत्रणेवर बारीक लक्ष आहे, असा सर्वांचा समज होता. पण, तो फोल ठरला. कोरोना काळात शासकीय यंत्रणाच काम करत असल्यामुळे त्यांचे सर्वांनी कौतुक केले. पण, ही यंत्रणाच आता ढेपाळली आहे. त्यामुळे कोरोनाच्या मृत्यूची संख्या जिल्ह्यात एक हजाराच्या पुढे गेली आहे. तर उपचार घेणा-या पॅाझिटिव्ह रुग्णांनी साडे नऊ हजारांचा टप्पा ओलांडला. त्यात जमेची बाजू इतकीच आहे की रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७९ टक्के आहे.
गेल्या काही दिवसात ऑक्सिजनचा तुटवडा, बेडची कमतरता, रॅपिड अँटिजेन कीटचा प्रश्न, खासगी रुग्णांलयातून होणारी लूट, तर कोठे बेड आहे, पण, डॅाक्टर, कर्मचारी नाही यासारख्या बातम्या धडकल्या. त्यानंतर आरोग्य यंत्रणा कशी ढिसाळ झाली हे दिसू लागले. कोरोना बाधितांची संख्या वाढणार आहे. याचा अंदाज बांधूनच लॅाकडाऊनच्या पहिल्या टप्यात त्याची तयारी करण्यात आली. त्यानंतर असे प्रश्न निर्माण कसे होतात, ही विचार करायला लावणारी बाब आहे. खरं तर कोरोना काळात सर्वांनी सकारात्मक धोरण स्विकारले. त्यामुळे कोठे चूक झाली, गैरसोय झाली, लुटालूट झाली तरी त्याबाबत सार्वजनिक ओरड झाली नाही. कुणीही त्याविरोधात टोकाची भूमिका घेतली नाही. त्याचा अर्थ मात्र यंत्रणेने व खासगी रुग्णालयाने चुकीचा घेतला.
काही खासगी रुग्णालयात होणारी रुग्णांची लूट तर भयावह अशीच आहे. त्यांनी तर कोरोना काळात संधीसाधूपणा केला आहे. त्यांची ओरड आता होऊ लागली आहे. सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या युवक संघटनेने तर या लुटालुटी विरोधात मोहिम उघडली असून हेल्पलाईन नंबर दिले आहेत. त्यातून अधिक माहिती समोर येईल. त्यातून किती जणांना फायदा होईल हे महत्त्वाचे असणार आहे. या लुटीबद्दल खरं तर सरकारी यंत्रणेने कडक कारवाई करण्याची गरज आहे. अशीच लुटालुट औषधांच्या बाबतीतही होत आहे. त्यात इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे भासवून मोठी रक्कम वसूल केल्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात घडले आहेत. तसेच, अनावश्यकरित्या उपलब्ध नसलेल्या इंजेक्शनचा तगादा लावून डॉक्टर नक्की काय साध्य करीत आहेत, हा सुद्धा गहन प्रश्न आहे.
विशेष म्हणजे, इतके सर्व होऊनही लोकप्रतिनिंधी मात्र या सर्व गोष्टींकडे कानाडोळा करत का आहेत? त्यांना हे प्रश्नच माहित नाही का? असा विचार सर्वसामान्यांच्या मनात येतो आहे. लोकप्रतिनिधींनी सुध्दा पुढे येऊन आरोग्य व्यवस्था, सरकारी यंत्रणा याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज आहे. सत्तेत असलेले मंत्री प्रयत्न करत असले तरी ते पुरेसे नाही. काही गोष्टींकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते. कडक भूमिका न घेतल्यामुळे लुटालुटीच्या घटना होतात. अगोदर टेस्टींगसाठी अशीच लुटालूट झाली अजूनही ती पूर्णपणे थांबलेली नाही. आता खासगी रुग्णांलयाकडून ती सुरु आहे. त्यांचे बिल हा तर संशोधनाचा विषय आहे. दुसरीकडे सरकारी यंत्रणेत सुसूत्रता आणणे सुध्दा तितकेच गरजेचे आहे.
खरं तर जिल्ह्यात रुग्णांची संख्या अगोदर कमी होती. मालेगावमध्ये ती सर्वाधिक होती. पण, मालेगावकरांनी एकजूट दाखवत संकटावर मात केली. त्यामुळे तेथील संख्या कमी झाली. पण, नाशिक शहरात आता ती सर्वाधिक झाली आहे. ग्रामीण भागातही संसर्ग लक्षणीरित्या फोफावला आहे. त्यामुळे कोरोना रोखण्यासाठी गंभीरपणे उपाययोजना करण्याची गरज आहे.
कोरोनाचे संकट मोठे आहे. ते लवकर संपणार नाही. या काळात सर्वांना मनोधैर्य देण्याचे काम करण्याची गरज आहे. अशा संकट काळात सर्वांनी एकत्रित येऊन एकमेकांना सहाय्य करण्याची भूमिकाच महत्त्वाची आहे. पण, तसे होताना दिसत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचे संकट आता अधिक गडद झाले आहे. कोरोनामुळे उद्योग, व्यापारावर परिणाम झाला. अनेकांच्या नोक-या गेल्या. हातावर काम करणा-यांसाठी तर हा कठीण काळच आहे. त्यामुळे अशा संकटकाळात सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. खासगी रुग्णांलयांनी सुध्दा या काळात ही लूट थांबवली पाहिजे. लोकप्रतिनिधींनी सुध्दा सरकारी यंत्रणेचे कान टोचून ढेपाळलेली यंत्रणा पुन्हा सक्रीय करावी लागणार आहे. सर्वांना कोरोनाशी लढायचे आहे. एकमेकांशी नाही. आतापर्यंत नाशकात एक हजार बळी गेले आहेत. आता या संख्येतील शून्य कसे कमी होतील व शेवटी शून्यच कसे राहिल या दिशेने सर्वांनी काम करण्याची गरज आहे. ते केले नाही तर कोरोनाचा `को` बाजूला पडेल व `रोना`च शिल्लक राहिल.
(संपर्क – मो. ९४२२७५६६५१. ई मेल – gsancheti@gmail.com)