बदल्यांचा धंदा
गणेशोत्सव पार पडल्यानंतर गृह विभागाने भारतीय पोलीस सेवेतील (आयपीएस) राज्यातील विविध ४५ अधिका-यांच्या बदल्या केल्या. त्यात नाशिकच्या तीन अधिका-यांच्या बदल्या सुध्दा चर्चेच्या ठरल्या आहे. कोरोना काळात या बदल्या केल्यामुळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टीकेची झोड उठवत ठाकरे सरकारने बदल्यांचा धंदा केला, असा थेट आरोप केला आहे. त्यामुळे या बदल्या तूर्त तरी वादाच्या भोव-यात सापडल्या आहेत. पण, या बदल्यांमुळे जिल्ह्यातील सामान्यांना मात्र धक्का बसला आहे. या बदल्यामागे नेमका काय धंदा झाला ? असा प्रश्नही काहींच्या मनात आहे. पण, त्याचे नेमके उत्तर कोणालाही मिळणार नाही व मिळाले तरी ते पटणार नाही.
- गौतम संचेती
(लेखक हे इंडिया दर्पण लाईव्हचे संपादक आहेत)
अधिका-यांच्या बदल्या होणे यात कोणतीही नवलाई नाही. प्रशासकीय सेवेत त्या होत असतात. त्यामागे अनेक कारणे असली तरी मुख्य कारणे कमीच असतात. त्यात अधिकारी वादग्रस्त असणे, त्याचा कार्यकाळ पूर्ण होणे, त्याचे स्थानिक नेत्यांशी न पटणे, विनंती बदली हे प्रमुख कारण असते. पण, काही बदल्यांमध्ये काहीच कारण नसते. त्यामुळे या बदलीकडे नेहमी संशयाची सुई असते. राज्यात झालेल्या ४५ अधिका-यांच्या झालेल्या बदल्यामध्ये काही बदल्या याच कारणातल्या आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते म्हणून देवेद्र फडणवीस यांनी बदल्यांचा धंदा केला असा आरोप केला. पण, हा धंदा कसा चालतो याबाबत ते सविस्तर बोलले नाही. त्यांच्या काळातही अशा बदल्या झाल्याच होत्या. त्यामुळे त्यांच्या आरोपाकडे राजकारणाचा भाग म्हणून बघितले जाईल. त्यामुळे बदल्यामागील गौडबंगाल अधिकृतपणे कधीही समोर येणार नाही. पण, त्याची चर्चा रंगत राहणार…
राज्यात झालेल्या ४५ अधिका-यांच्या बदल्यामध्ये नाशिकमध्ये तीन वरिष्ठ अधिका-यांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यात दोन अधिका-यांचे पदाचा थेट सामान्य माणसांशी संबध आहेत. कोरोना काळात त्यांनी केलेली कामगिरी चांगलीच होती. नाशिकचे पोलिस आयुक्त विश्वास नागरे पाटील यांनी घेतलेले काही उपक्रम व जिल्हा पोलिस अधीक्षक असलेल्या डॅा. आरती सिंह यांनी मालेगावमध्ये कोरोना काळात केलेली कामगिरी लक्षवेधीच होती. या दोन्ही अधिका-यांचा कार्यकाळ दीड वर्षाच्या आसपासच राहिला. त्यामुळे कोरोना काळात या दोन्ही अधिका-यांच्या बदलीची गरज होती का हा खरा प्रश्न आहे.
या दोन अधिका-यांबरोबरच नाशिक परिमंडळाचे विशेष पोलिस महानिरीक्षक छेरिंग दोरजे यांची बदली झाली आहे. पण, त्यांच्या बदलीनंतर बागलाण तालुक्याचे भूमीपूत्र असलेले प्रताप दिघावकर हे येणार असल्यामुळे त्याचा आनंदही सर्वांना आहे. विश्वास नागरे पाटील यांच्या जागी आता नव्याने येणारे दीपक पाण्डेय हे आय़ुक्तपदाचा कार्यभार सांभाळतील. त्यांच्याकडून आपण चांगल्या कामाची अपेक्षा करु या. तर डॅा. आरती सिंह यांच्या जागी कोण येणार हे निश्चित नाही. त्यामुळे त्याच्यासाठी तूर्त तरी वाट बघावी लागणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे ही संख्या कशी कमी करता येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात या बदल्यांचे सत्र सुरु झाल्यामुळे त्याचा निश्चितच कामावर परिणाम होणार आहे. महानगरपालिका आयुक्तांची पहिले बदली झाली. त्यानंतर या दोन अधिका-यांच्या बदल्या झाल्या. त्यामुळे ग्राऊंडवर काम करणारे हे अधिकारी आता दिसणार नाही. त्यांची जागा दुसरे घेतील. पण, त्यांना वेळ द्यावा लागणार आहे…
राज्यात झालेल्या या बदल्यामागे शिवसेना व राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. जिल्ह्यात दोन्ही पक्षाचे मंत्री आहे. त्यांनी यात हस्तक्षेप का केला नाही ? त्यांना हे अधिकारी नको होते का ? असे प्रश्न उपस्थितीत होत राहणार. त्यामुळे त्यांनी याबाबत बोलायला हवे. एकुणच बदल्यांचा धंदा झाला आहे का ? किंवा या बदल्या प्रशासकीय कारणाने योग्य होत्या. हे समोर यायला हवे. पण, तसे होणार नाही. आरोप होत राहतील त्याला उत्तरही दिले जातील. काही जण गंधा है पण, धंदा है असे म्हणून समर्थनही करतील. विशेष म्हणजे या धंद्याचे पेटेंटही राजकारण्यांनीच राखून ठेवले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना बदल्यांचा धंदा कधीच कळणार नाही…