पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता पाचवी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा तसेच पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा (इयत्ता आठवी) निकाल जाहीर करण्यात आलं आहे. निकाल जाहीर झाला असला तरी अधिकृत वेबसाईटवर निकाल दिसत नसल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले आहे.
इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी १६ फेब्रुवारी २०२० रोजी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आल्या होत्या. सात महिने उलटूनही परीक्षेचा निकाल लागत नसल्याने विद्यार्थी नाराज झाले होते. मात्र अखेरीस परीक्षेचा निकाल अधिकृत वेबसाईटकवर जाहीर करण्यात आला आहे. निकाल जाहीर झाला असला तरी निकालाची लिंक उघडत नसल्याचे विद्यार्थी आणि पालकांचे म्हणणे आहे. तांत्रिक अडचणीमुले निकाल दिसत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचप्रमाणे गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास संबंधित शाळांच्या लॉगइनद्वारे २० ऑक्टोबरपर्यंत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. गुणांच्या पडताळणीसाठी ५० रुपये प्रती पेपर शुल्क आकारली जाणार आहे. निकाल पाहण्यासाठी व अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी http://www.mscepune.in या वेबसाइटला भेट द्यावी.