फाशीच्या डोंगरावर नकोशीला फेकले
नाशिक : फाशीच्या डोंगराच्या पायथ्याशी नुकत्याच जन्मास आलेल्या स्त्री जातीच्या अर्भकास कुणी तरी फेकुण दिल्याचा प्रकार समोर आला. भरदिवसा उघडकीस आलेल्या या घटनेने शिवाजीनगर परिसरात खळबळ उडाली असून, नकोशी झाल्याने अथवा अनैतिंक संबधातून अर्भकाचा जन्म झाल्याने त्यास फेकण्यात आल्याची चर्चा दिवसभर परिसरात होती.
शिवाजीनगर येथील जलनगरी परिसरात असलेल्या फाशीचा डोंगराजवळ रस्त्याच्या कडेला शनिवारी (दि.६) सकाळी साडेअकरा वाजता नुकतेच जन्म झालेली (साडेतीन तासाची ) मुलगी आढळून आली. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार परिसरातील रविंद्र पवार हे पाळीव कुत्र्यास सोबत घेवून फेरफटका मारत असतांना रस्त्याच्या कडेला लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला.त्यांनी जवळ जावून बघितले असता, एका प्लॉस्टिक च्या गोणीमध्ये बाळाला कपडयात गुंडाळून ठेवले होते. पवार यांनी तत्काळ पोलीसांशी संपर्क साधल्याने नकोशीस वेळीच उपचार देण्यात यश आले. चिमुकीलीवर जिल्हारूग्णालयात उपचार सुरू असून तिच्या प्रकृर्तीत सुधारणा होत असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली. याप्रकरणी अज्ञात मातेविरोधात गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
……..
उकळते डांबर अंगावर पडल्याने दोन महिला भाजल्या
नाशिक : रस्त्यावर डांबरीकरण करीत असताना उकळते डांबर अंगावर पडल्याने दोन कामगार महिला भाजल्याची घटना एकलहरा येथे घडली. या घटनेत महिला गंभीर भाजल्या असून त्यांच्यावर जिल्हारूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
मायाबाई अमितचंद यादव (४०) आणि जमुनाबाई सोमनाथ शेलार (३८ रा.दोघी शिंंदे गाव ता.जि.नाशिक) असे भाजलेल्या कामगार महिलांची नावे आहे. एकलहरा येथील पॉवर हाऊस भागात रस्त्याचे डांबरीकरणाचे काम सुरू आहे. या ठिकाणी महिला काम करीत असतांना ही घटना घडली. तापत्या डांबराच्या बॅरल जवळ महिला झाडझुड करीत असतांना अचानक उकळत्या डांबराचा फवारा उडाला या घटनेत दोन्ही महिलांच्या अंगावर डांबराचा सडा पडल्याने त्या गंभीर भाजल्या. ठेकेदाराचे सुपरवायझर अनिल ढाले यांनी त्यांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असून त्यांच्या प्रकृर्तीत सुधारणा होत असल्याची माहिती वैद्यकीय सुत्रांनी दिली.
………