दिंडोरी – नाशिक जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी दिले जाणारे गुणवंत मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व आदर्श शैक्षणिक संस्था पदाधिकारी पुरस्कार यंदा तालुकास्तरावर देण्यात येत आहेत. भगूर येथे दरवर्षी जिल्ह्याचा एकच सोहळा होतो. यंदा कोरोनामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे संयोजक संग्राम करंजकर यांनी सांगितले आहे.
दिंडोरी तालुक्यातील गुणवंत मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पुरस्कार सोहळा जनता इंग्लिश स्कूलमध्ये मुख्याध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष गुलाब भामरे, के के अहिरे, साहेबराव कुटे, आर डी निकम, सी बी पवार, एन एन खैरनार, सुनिल भामरे, किशोर जाधव, बी जी पाटील, संग्राम करंजकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार माध्यमिक विद्यालय पिंपरखेड येथील उपशिक्षक डी जी वाणी यांना व गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार ए डी काळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. प्रास्तविक करंजकर यांनी केले. यावेळी तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गुणवंत शिक्षक व मुख्याध्यापक यांचे जे आर डी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ई के कांगणे व सर्व संचालक मंडळ, गटशिक्षणाधिकारी भास्कर कनोज, विस्तार आधिकारी सुभाष पगार, पोलिस पाटील, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत, सदस्य ग्रामस्थ पालक यांनी हार्दिक अभिनंदन केले आहे.