मुंबई – आगामी महानगरपालिका, नगरपालिका त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या झेंड्याखाली एकत्र लढवण्याचा निर्णय शिवसेनेच्या बैठकीत घेण्यात आला आहे. पक्ष नेत्यांनी त्या अनुषंगाने निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.
या निवडणुकांसंदर्भातील रणनीतीवर शिवसेनेची खलबते सुरू असून याबाबत अंतिम निर्णय उद्धव ठाकरे घेतील, अशी माहिती शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. कोरोना संसर्गामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या कल्याण-डोंबिवली, औरंगाबाद महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. तसेच, फेब्रुवारी २०२२ मध्ये नाशिक महापालिकेची तसेच जिल्हा परिषदेचीही निवडणूक होणार आहे. या सर्व निवडणुका आता महाविकास आघाडी एकत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.