ठाणे – ठाणे शहरातील जय संतोषी माता महिला बचत गटाची संचालिका श्रीमती जयश्री कराळे यांनी शिवभोजनच्या थाळीमुळे बचत गटाला कशी उभारी मिळाली हे सांगितले. त्या म्हणल्या की २००८ मध्ये १२ महिला सदस्य मिळून ठाणे महानगर पालिकेत नोंदणी करुन आम्ही बचतगटाची स्थापना केली. खासगी बॅंकेकडून कर्ज घेऊन जेवण बनविण्यासाठी गॅस चुला, कढई, मोठे पातेले, झारा, कलथा, इत्यादी साहित्य खरेदी केलं. महानगरपालिका शाळेतील अंगणवाडीत ७०० विद्यार्थ्यांना खिचडीपुरवठा व इयत्ता १ ली ते १० वी या वर्गातील विद्यार्थांना शाळेत पोषण आहार या योजनेत २००० विद्यार्थांसाठी जेवणाचा ठेका मिळाला. याद्वारे या महिला बचतगटाची प्रगती होऊन आर्थिक आलेख उंचावत गेला.
असे मंजूर झाले शिवथाळी केंद्र
बचत गटाचा आलेख उंचावत असतांना शिवथाळी केंद्र कसे मंजुर झाले याबाबतही कराळे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, बातम्या पाहत असताना महाराष्ट्र शासनाकडून गरीब आणि गरजू यांच्या आहाराकरिता अगदी अत्यल्प दरात शिवभोजन जेवणाची थाळी सुरु करण्याची योजना पाहिली. या योजनेचा लाभ आपण घेवू शकतो असा मनात विचार आला. दुसऱ्या दिवशी बचत गटाच्या महिलांबरोबर यासंदर्भात चर्चा केली. योजनेसाठी उपनियंत्रण शिधावाटप कार्यालय फ परिमंडळाचे उपनियंत्रक अधिकारी एस.आर वंजारी यांना भेटून बचतगटाच्या माध्यमातून शिवभोजन योजनेचा पुरवठादार म्हणून सहभागी होण्याचे नियम व निकषांची माहिती घेतली. विहित नमुन्यातील अर्ज भरुन कागदपत्रांची योग्य मुदतीत पूर्तता करुन दिली. योजना बचतगटाच्या नावे मंजूर झाली.
२०० व्यक्तींना जेवण सुरु झाले
केंद्र मंजूर झाल्यानंतर ठाण्यातील यशोधन नगर येथील हॅप्पी हाईट्स मधील तळमजल्यात शॉप नंबर जी-१ येथे शिवभोजन केंद्र सुरु करण्यात आले. शासनाच्या नियामाप्रमाणे ५ रुपये थाळी (२ चपात्या, १ वाटी भाजी, भात, वरण) समाविष्ट करुन २०० व्यक्तींना जेवण देणे सुरु झाले. कोरोना विषाणू प्रादुर्भाव काळात मजूर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी इत्यादी नागरिकांना या योजनेचा चांगल्या प्रकारे लाभ मिळाला. बचतगटाच्या शिवभोजन योजना मंजूर केल्यामुळेच ही उभारी मिळाल्याचे जयश्री कराळे यांनी सांगितले.