कोल्हापूर – येथील पन्हाळगड आजपासून अधिकृतरित्या खुला करण्यात आला आहे. तब्बल सात महिन्यानंतर पन्हाळगडाचे दरवाजे पर्यटकांसाठी खुले झाले आहेत. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळते आहे. पन्हाळा नगरपरिषदेतर्फे हा निर्णय घेण्यात आला आहे. सकाळी ९ ते रात्री ९ वाजेपर्यंत पन्हाळगडावर पर्यटकांना परवानगी दिली जाणार आहे. शासनाच्या सर्व नियमाचे पालन करणे पर्यटकांना बंधनकारक असल्याचे नगरपरिषेदेतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर, सॅनिटायझरचा वापर अशा सर्व नियमांचे आणि अटींचे पालन करून पन्हाळगडाची सैर करता येणार असल्याचे नगराध्यक्ष रुपाली धडेल यांनी स्पष्ट केले आहे. जवळपास सात महिने गडावर पर्यटक नसल्याने ७० टक्के व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली होती. आजपासून पन्हाळा गड पर्यटकांसाठी खुला झाला असल्याने अर्थकारणाला गती मिळेल, असे सांगत व्यावसायिकांनी आनंद व्यक्त केला आहे.