नाशिक – अवकाळी पावसामुळे शहरात अनेक झाडे तसेच फलक कोसळले. शिवजन्मोत्सव समितीचा पडलेला फलक उचलून पुन्हा लावत असताना विजेचा शॉक लागल्याने २ तरुणांचा मृत्यू झाला आहे. तर २ जण जखमी झाले आहेत. वडनेर रोडवर ही घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडनेररोड वरील राजवाड्याकडे जाणाऱ्या चौकात शिवजन्मोत्सव समितीचा फलक लावलेला होता. गुरुवारी झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्याने हा फलक कोसळला. आज दुपारी रस्त्याने जाणाऱ्या दोन युवकांनी हा पडलेला फलक उचलला आणि उभा केला. त्याचवेळी वीज तारांचा या फलकाशी स्पर्श झाला आणि त्याचा जबर शॉक या तरुणांना बसला. त्यात अक्षय किशोर जाधव (वय २६ रा. वडनेर गाव) आणि राज मंगेश पाळदे (वय २०, रा. सौभाग्य नगर) या दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तसेच दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
घटनेची दखल घेत नागरिकांनी चौघांना तातडीने बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र जाधव आणि पाळदे यांची प्राणज्योत मावळल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेने शहरात हळहळ व्यक्त होत आहे. मयत राज पाळदे हा एकुलता एक मुलगा होता तर जाधव यांच्या पाश्चात दोन भाऊ आहेत. हॉस्पिटलमध्ये सर्व शिवभक्त, नागरिक, अनेक पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी गर्दी केली होती.