मुंबई – छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर उत्साह असून शिवाजी महाराजांचचं जन्मस्थळ शिवनेरी किल्ल्यावरही उत्साह होता. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शिवनेरीवर कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात राजकीय कोट्याही पहायला मिळाल्या.
आमदार अतुल बेनके यांनी भाषणात अजित पवार यांचं कौतुक केलं. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांना सात भाषा यायच्या. त्यापैकी एक म्हणजे ते डोळ्यांनी मावळ्यांशी बोलायचे. आता अशी भाषा उपमुख्यमंत्री अजित पवार वापरतात. आमदार बेनके यांनी असं म्हणताच अजित पवार यांनी हात जोडले.
आमदार बेनके यांच्या वक्तव्याचा आधार घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फिरकी घेतली. ते म्हणाले, की आमदार बेनके म्हणाले दादांना डोळ्यानं बोलण्याची भाषा येते. आता मला ती भाषा शिकावी लागणार का, मला दादांच्या मनातलं ओळखता आलं पाहिजे. गॉगल घातला तरी मी दादांच्या मनातलं सगळं ओळखून दाखवणार, असं मुख्यमंत्री म्हणताच एकच हशा पिकला. या हास्यविनोदानं वातावरण हलकंफुलकं झालं होतं.