सातपूर: शिवजयंतीचे औचित्य साधत सातपूर शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने यंदा १९ फेब्रुवारीला भव्य रंगमंचासह १५० कलाकारांचा समावेश असलेले “शिवायन भाग -२ शिवशंभो” या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी शनिवारी सकाळी या सोहळा समिती कार्यालयचे उदघाटन फीत कापून करण्यात आले. यावेळी समितीच्यावतीने सांगण्यात आले की, संपूर्ण सातपूर परिसरात भगवे ध्वज लावू सुशोभीकरण करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या मुख्य ठिकाणी उंच स्तंभावर भगवा ध्वज लावला जाणार आहे. १८ फेब्रुवारी रात्री परिसरातील महिलांच्या उपस्थितीत शिवरायांचा पाळणा संपन्न होणार आहे. समितीच्या वतीने शिव पूजनासाठी यावर्षी संभाजी महाराजांचे शौर्य सांगणारा रामशेज किल्ला या ठिकाणाहून माती आणली जाणार असल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.
सालाबादाप्रमाणे १९ फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त अठरा पगड जातींना सोबत घेऊन शिवजन्मोत्सव साजरा करण्याची प्रथा सातपूरकरांनी रुढ केली आहे. त्याअनुषंगानेच यावर्षीही ही प्रथा कायम ठेवत येत्या १९ फेब्रुवारीला एकाच ठिकाणी भव्य दिव्य असा कार्यक्रम साजरा करत शिवजन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे. त्यानिमित्त सावरकरनगर येथील पटांगणावर १५० कलाकारांचा समावेश असलेल्या रंगमंचावर शिवरायांच्या जन्मापासून तर राज्यभिषेक सोहळ्यापर्यंतचा दिमाखदार सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
महानाट्याची वैशिष्ट्ये-
७२फूट भव्य रंगमंच, मराठी नाट्यसृष्टीतील नामवंत कलाकार, विद्युत रोषणाई,आतिषबाजी, घोडे उंट यांचा वापर, श्री छत्रपती शिवाजी महाराज व श्री छत्रपती संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा, छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य दाखवणारे महानाट्य आदी..