मनपा आयुक्त गमे यांची बिटको हॉस्पिटल व ठक्कर डोम कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी
नाशिक – नाशिकरोड येथील नवीन बिटको हॉस्पिटल व एबीबी सर्कलजवळील ठक्कर डोम कोविड सेंटरला महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. शिल्लक कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी विभागप्रमुखांना दिल्या. या दोन्ही ठिकाणी अत्याधुनिक सुविधांनी युक्त नवीन कोविड सेंटर साकारले जात आहे. येथे दिल्या जाणाऱ्या सुविधा व रुग्णांसाठी बेड, कोरोना कक्ष, स्वतंत्र घंटागाडी, अग्निशमन दलाचे वाहन, नियमितपणे स्वच्छता राहील या दृष्टीने नियोजन करणे, आवश्यक त्या कर्मचारीवर्गाची नेमणूक करणे, येथे ठेवण्यात आलेले बेड व रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सुविधा याबाबतची सविस्तर माहिती घेतली.
या असतील सुविधा
रुग्णांसाठी योगा, बुद्धिबळसारख्या खेळांची व्यवस्था करण्यात आली आहे. नवीन बिटको रुग्णालय येथे पाहणी प्रसंगी अँटिजेन तपासणी कक्षाची पाहणी करून त्याबाबतची सविस्तर माहिती घेतली. तसेच रेकॉर्ड रूम, इंटरकॉम सुविधा,ऑक्सिजन पुरवठा त्यासाठी आवश्यक असणारी पाइपलाइन, व्हेंटिलेटर, लिफ्ट आदी सर्व कामकाजाची माहिती घेण्यात आली. जी कामे शिल्लक आहे ती तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी विभागप्रमुखांना दिल्या.
रुग्णांशी संवाद
आयुक्तांनी बिटको हॉस्पिटलमधील रुग्णांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. रुग्णांच्या उपचारात कुठलीही कमतरता भासणार नाही याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी वैद्यकीय विभागास दिल्या. रुग्णांवर होणारे औषध उपचार, भोजनाची व्यवस्था याची त्यांनी खात्री केली. काही सूचना असल्यास निःसंकोचपणे त्या मांडा, असे आवाहन आयुक्तांनी रुग्णांना केले.