शिरपूर – तालुक्यातील जनतेसह धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातील सर्वसामान्यांना उत्तम आरोग्य सेवा मिळणार आहे. मुंबई येथील श्री विले पार्ले केळवणी मंडळ मार्फत शिरपूर येथे ना नफा ना तोटा या तत्वावरील ७५० बेडचे अत्याधुनिक व सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
श्री विले पार्ले केळवणी मंडळाचे अध्यक्ष व एन. एम. आय. एम. एस. अभिमत विद्यापीठाचे कुलपती माजी मंत्री अमरिश पटेल यांनी गेल्या ३५ वर्षांपासून राजकीय व सामाजिक जीवनात सेवाव्रत अंगिकारले आहे. सर्वसामान्य गोरगरीब, सर्व नागरिकांच्या उत्तम आरोग्य सेवेसाठी ७५० बेडचे अत्याधुनिक हॉस्पिटल लवकरच सेवेत येणार आहे. शिरपूर शहरापासून अतिशय जवळ खर्दे बु. शिवारात २२ एकर जागेवर उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
सुरुवातीला पहिल्या दोन वर्षांमध्ये ३०० बेडचे आणि त्यानंतर ४५० बेडचे असे एकूण ७५० बेडचे हॉस्पिटल म्हणून नावारूपास येणार आहे. यासाठी एकूण तब्बल ३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च येणार आहे. शहरातील अरुणावती नदी काठावरील शनी मंदिर परिसरात गुजर खर्दे बुद्रुक शिवारात या हॉस्पिटलचे काम सुरू करण्यात आले आहे.
माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व मोजक्या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन नुकतेच झाले आहे. टप्प्याटप्प्याने हॉस्पिटल सोबत विविध मेडिकल कॉलेजेस देखील सुरू करण्यात येणार आहेत. यामुळे शिरपूर तालुक्यासह संपूर्ण खान्देशातील विद्यार्थ्यांना मेडिकल कॉलेजेसचा देखील लाभ मिळणार आहे. संपूर्ण खान्देशातील नागरिकांना अत्याधुनिक हॉस्पिटलच्या आरोग्य सेवेचा लाभ मिळणार आहे.