नवी दिल्ली ः देशात कोरोनाच्या फैलावामुळे लॉकडाउन लावण्यात आलं. त्यामुळे अर्थव्यवस्था वाढीसाठी असलेले उद्योगधंदेच बंद झाल्यानं बेरोजगारांची संख्या वाढली आहे. हातावर पोट भरणा-यांचे हाल झाले. पण, बेरोजगारीच्या हे वास्तव तेव्हा समोर आले जेव्हा हरियाणामधल्या सोनिपतमध्ये शिपाईपदासाठी जागा काढण्यात आल्या.
एका हिंदी संकेतस्थळानं याबाबत वृत्त दिलं. सोनिपतमधल्या एका न्यायालयामध्ये १३ शिपायांच्या जागांसाठी २७६७१ तरुणांनी हजेरी लावली. या जागेसाठी केवळ ८ उत्तीर्ण असणं अपेक्षित आहे. परंतु पदवी आणि पदव्युत्तरचं शिक्षण झालेल्या तरुणांनी अर्ज करून भली मोठी रांग लावली होती. नोकरीच मिळत नसल्यानं या पदासाठी अर्ज केल्याची माहिती अनेक तरुणांनी दिली. कुटुंबावरील आर्थिक भार करण्यासाठी नोकरीची गरज असल्याचं तरुणांनी सांगितलं. हरियाणामध्ये बेरोजगारीच्या संकटानं गंभीर रूप धारण केलं असून, ड गटाच्या भरतीसाठी उच्चशिक्षित तरुण अर्ज करू लागले आहेत.
यात तीन हजार उमेदवारांना तपासणी आणि कागदपत्रांच्या तपासणीसाठी बोलावण्यात आलं होतं. अर्ज विचाराधीन घेण्याआधी सर्व कागदपत्रांची तपासणी केली जाते. कागदपत्रं उपलब्ध नसतील तर अर्ज बाद केला जातो. २३ फेब्रुवारीपर्यंत अर्जाची छाननी होणार आहे.