शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंगजी
गुरू नानक देवजी यांनी शीख पंथाची स्थापना केली , तर शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंग यांनी शीख पंथांची महान परंपरा पुढे सुरू ठेवून खालसाची स्थापना केली ,खालसा म्हणजे पवित्र आणि सत्यासाठी लढाऊ लोक होय. गुरु गोविंदसिंगजी यांचा आज दि. ७ रोजी स्मृतिदिन त्यानिमित्त विशेष लेख…
ही घटना आहे, सुमारे सव्वातीनशे वर्षा पुर्वीची,पंजाबमध्ये सतलज नदीच्या तीरावर वैशाखी पौर्णिमेच्या दिवशी दि.३० मार्च १६९९ रोजी एक मोठा यज्ञ सुरु होता. यात उज्जैन येथील पंडित दत्तानंद यांना बोलविण्यात आले. दुर्गेची पूजा करून समाजातील विषमता, रोगराई ,श्रीमंत-गरीब यांमधील भेद नष्ट करण्याचा संकल्प करण्यात आला. याच दरम्यान आनंदपुर येथील धर्म संमेलन भरवण्यात आले. या संमेलन सुमारे ८० हजार शीख आणि अन्य समाज बांधव जमले होते. त्यावेळी एक धर्मगुरु यांनी बुलंद आवाजात प्रश्न केला. धर्मासाठी कोण बलिदान देण्यास तयार आहे?
कोण होते, ते शूर आणि थोर धर्मगुरु ते होते,शिखांचे दहावे गुरु गोविंदसिंग. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यावेळी पाच शूर सरदार पुढे आले. त्यानंतर एक लोखंडी कढईत पाणी घेऊन त्यात दुधारी तलवारीने साखर मिसळून ते अमृत तीर्थ म्हणून सर्वांना देण्यात दिले. तसेच त्यांना पंचप्यारे तथा सिंह ही पदवी बहाल करण्यात आली. त्यानंतर हजारो लोक या पंथात सामील झाले अशी दिक्षा प्राप्त झाल्याने त्यांना खालसा म्हणजेच पवित्र किंवा स्वतंत्र असे संबोधण्यात येऊ लागले.
गुरु गोविंदसिंग यांचा जन्म दि. २२ डिसेंबर १६६६ रोजी पाटणा शहरात झाला. त्यांचे वडील व नववे गुरू तेगबहादूर यांच्यानंतर वयाच्या नवव्या वर्षीच त्यांना गुरु पदाची गादी सांभाळावी लागली. त्यावेळी गुरू तेगबहादूर यांच्या बलिदानामुळे संपूर्ण जनतेची सहानभुती शीख संप्रदाय कडे वळली होती. गुरु पदावर विराजमान झाल्यानंतर गुरु गोविंदसिंग यांना कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले. परंतु अनेक संकटांना धैर्याने तोंड देत त्यांनी आत्मसमर्पणाला तयार असलेल्या ईश्वर निष्ठ आणि देशभक्त सैन्याची उभारणी केली. त्यांची सैन्यशक्ती वाढलेली पाहून राजा भीमचंद व अन्य राज्यांनी गुरू गोविंदसिंगजी यांच्या सैन्याशी युद्ध पुकारले.
बियास नदी काठावर झालेल्या या युद्धात सैन्याने विजय मिळवला. त्यानंतर झालेल्या दोन युद्धात त्यांनी बाजी मारली. या काळात गुरूंच्या सैन्यांची संख्या ८० हजार पेक्षा जास्त होती. गुरु गोविंदसिंग यांना राजेपदाचा बहुमान प्राप्त झाला. युद्ध थांबल्यानंतर गुरु गोविंदसिंग यांनी शिख तरुणांच्या शक्तीचे व्यवस्थित संघटन केले. सतलज नदीच्या तीरावर वैशाखी पौर्णिमेला त्यांनी खालसाची संरचना केली.
एक प्रकारे शिख पंथांमध्ये आत्मसंरक्षणासाठी खालसा या लढाऊ सैन्याची त्यांनी स्थापना केली, असे म्हणतात. त्यानंतर परकीय आक्रमणे वाढू लागली. त्या नंतरच्या काळात सुमारे पाच लढाया झाल्या. गुरु गोविंदसिंग यांचे चार झुंजार पुत्र मारले गेले. तेव्हा त्यांनी औरंगजेबाला जफर नामा म्हणून पत्र पाठवले. त्यात लिहिले की, माझे चार मुलगे मारून तू काय मिळवले, माझा पाचवा पुत्र खालसा जिवंत आहे, तो नागासारखा आहे, तो तुझा नाश करेल. त्यानंतर विशाल मोगल सैन्याची टक्कर देताना गुरुगोविंद सिंग यांनी मोठे कौशल्य दाखवले. पुढे नांदेड येथे एका मारेकऱ्याने त्यांच्यावर हल्ला केला, त्यात त्यांचा अंत झाला. अंतकाळ जवळ आला असताना त्यांनी शीख संप्रदायाचा गुरु म्हणून कोणत्याही व्यक्तीची नेमणूक केली नाही तर गुरुग्रंथसाहेब या ग्रंथांलाच गुरू स्थानी विराजमान केले.