साक्री – कोविड-१९ मुळे राज्यातील सर्व अनुदानित आश्रम शाळां बंद ठेवण्यात आल्या आहेत. परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून आदिवासी विकास विभागाच्यावतीने “शाळा बंद, शिक्षण चालू” हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अंतर्गत अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा, वाकी (ता. साक्री) येथील प्राथमिक शिक्षक विनय साळुंके यांनी सध्या अभिनव संकल्पना हाती घेतल्या आहेत. गांव-पाड्यांवर जाऊन विद्यार्थ्यांना अध्यापन, शैक्षणिक मार्गदर्शन तसेच पालकांमध्ये”कोरोना”या विषाणूजन्य आजाराविषयी जनजागृती करत आहेत. साळुंके यांचा उत्साह आणि त्यांची ही पद्धत पाहून विद्यार्थी व पालक खुष आहेत. संस्थेचे अध्यक्ष योगेंद्र भोये, प्रकल्प अधिकारी राजाराम हाळपे, स. प्र. अधिकारी पी.के.ठाकरे, शिक्षण विस्तार अधिकारी सी.बी.साळुंके, मुख्याध्यापक साळुंके यांचे मार्गदर्शन त्यांना लाभत आहे.