आज शिक्षक दिन,मनमाड महाविद्यालयात असताना डॉ यशवंत पाठक सरांच्या सहवासातील खूप आठवणी तरळून गेल्या. ही एक…
मधली सुट्टी ….
चांदवडला एफ वाय झालं .मराठी स्पेशल घ्यायचा होता. सतीश पिंपळगावकर सर म्हणाले मनमाडला घे. तिथली लायब्ररी चांगली आहे. म.सु.पाटील आणि प्रभाकर बागले सर तिथे प्राचार्य होते.त्यांच्या काळात खूप चांगली पुस्तकं त्यांनी घेतली आहेत. तिथे यशवंत पाठक सर आहेत मराठीला त्यांना भेट मी पाठवलं असं सांग. मग काय ठरलं एकदाचं. पाठक सरांचं नाव आठवलं आणि मनात एक जुनी आठवण लख्ख झाली. हे नाव कुठे तरी वाचलं होतं. घाईत घरी आलो सुटकेस काढली. त्यात जुन्या वर्तमान पत्रांची काही कात्रणे करून ठेवली होती आठवीला असताना. म्हणजे आमच्या जुन्या घरी माळावर उन्हाळ्यात गौऱ्या रचत होतो. वरच्या खात्यात काही दिवाळी अंक आणि वर्तमान पत्रे होती जुनी. वाचनाची आवड असल्यानं मी काम थांबवून खात्यात हात घातला. पुस्तकं चाळली. किर्लोस्कर,रत्नप्रभा ,जत्रा, अशी कितीतरी जुनी म्हणजे १९७४-७५ सालातील दिवाळी अंक हाती लागली. त्यातली चित्रे मला खूप आवडली.मी ती वरून खाली टाकली.भाऊ ओरडला त्याला हात लावू नकोस दादा रागावतील. म्हटलं रागवू दे. काही वर्तमान पत्र होती. कागदं जुनी असल्यानं थोडी पिवळसर आणि जीर्ण झाली होती. मग अलगद उचकली. तेव्हाच्या बातम्या,अक्षरांचे font , चित्रपटाच्या जाहिराती सारंच वेगळं होतं. मला चित्रपटाच्या जाहिराती खूप आवडल्या. त्या रेखाटन केलेल्या होत्या. त्यांची कात्रणे करायला मी तीही खाली टाकली. केव्हा गौऱ्या रचून होतील असं झालं होतं.सर्व लक्ष खाली टाकलेल्या अक्षर खजिन्यावर होतं.गौऱ्या रचून झाल्यावर घाईनेच खाली उतरलो. दिवाळी अंक उचलून अभ्यासाच्या खात्यात ठेवली. वर्तमान पत्र चाळू लागलो.त्यात प्रा.डॉ.यशवंत पाठक यांना पी.एच.डी. जाहीर झाल्याची बातमी होती मनमाडहून. मी मनमाड एकदा बस मधून पाहिलं होतं येवल्याला जाताना. म्हटलं जवळ आहे मनमाड हि बातमी कात्रण करून ठेवू. जेव्हा केव्हा हे गृहस्थ भेटतील तेव्हा त्यांना देवू. आज नेमकं ते सर मराठी शिकवतात हे कळलं आणि आंनद झाला होता. सुटकेस मधून कात्रण काढलं पुन्हा वाचलं आणि ठेवून दिलं.
पूर्वी मनमाडला कायम भानगडी तनगडी व्हायच्या. कधी दंगली तर कधी हाणामाऱ्या अशाच वार्ता कानावर यायच्या.म्हणून मनमाडला एडमिशन घेवू नको म्हणून घरातून विरोध झाला. म्हटलं गाव कसं आहे तिथे गेल्याशिवाय कसं कळेल. मी निर्णयावर ठाम होतो. कारण तिथली न पाहिलेली लायब्ररी मला दिसत होती. मला खूप पुस्तकं वाचायची होती. आईकडून भाड्याला पैसे घेतले. एडमिशनला मी काम करून काही जमवले होते.आवश्यक कागदपत्रे घेवून मनमाड गाठलं. कॉलेज चांदवड रोडवरच होतं म्हणून तिथेच उतरायला सोपं गेलं. इथे येण्यामागे अजून एक स्वार्थ होता .तो म्हणजे रोज बसने प्रवास करायला मिळणार होता. गेट मधून आत घुसलो.मोठी बिल्डींग प्रशस्त आवार. मुलं मुली मस्त एकत्र गप्पा मारत हिरवळीवर बसलेली. हे मला नवीनच. आमच्याकडे मुलींशी बोलायचं म्हणजे कठीण काम. त्यात आपण असे लाजरे बुजरे. इथलं माहोली हवामान मानवेल कि नाही मनात शंका आली. ऑफिस जवळ शिपाई उभा होता .मी विचारलं यशवंत पाठक सर कुठे भेटतील. त्यांनी बोट दाखवलं ते पहा तिकडे चालले. मग मी घाईनेच त्यांच्या मागे गेलो.नमस्कार केला .तेही नमस्ते म्हणाले.
म्हटलं, ‘मला मराठीला एडमिशन घ्यायचं आहे. मी चांदवडचा.’
ते म्हणाले, ‘अच्छा’ आणि परत चालू लागले.
मी थांबून बघतच बघतच राहिलो. हा माणूस तर भावही नाही देत.
मी परत धावत जावून त्यांना थांबवलं म्हटल, ‘सर सतीश पिंपळगावकर सरांनी तुम्हाला भेटायला सांगितलंय. ते माझे गुरु.’
सर फक्त बरं बरं म्हणाले, आणि पुन्हा पुढे निघाले.
आता काय करावं सुचेना.उगीच आलो इथे असं झालेलं. केवढी चांदवडला आपली किंमत करायचे सर्व. हे तर बोलत पण नाहीत. निघण्यासाठी माघे फिरलो आणि आठवलं कि या माणसाचं बातमीचं कात्रण आणलंय आपण ते देवून तरी टाकू.उगीच जपून ठेवलं आपण याचं दुखं झालं. परत जावून त्यांना गाठलं. ते आपले घाईतच.
सर एक मिनिट थांबा.
आणि ते कात्रण दिलं हातात. म्हटलं मी आठवीला असताना हे कात्रण कापून आणि जपून ठेवलंय. भविष्यात कधी तुम्हाला भेटेल तेव्हा देईन असं समजून ठेवलं होतं. कात्रण पाहून पाठक सर आवाक झाले.
अरे ! हे तर खूप जुनं आहे . चल आपण चहा घेवू असं म्हणून गळ्यात हात टाकत मला घेवून कॅन्टीनकडे निघाले.
माघारी फिरताना मी खूप रडकुंडी झालो होतो.आता गहिवरलो.
सर म्हणाले, ‘अरे मला दूरदर्शनवर व्याख्यान आहे. १२ ला रेल्वे आहे म्हणून मी घाईत निघालो होतो. आता जेवण रद्द तुझ्याशी गप्पा मारून पोट भरेल.
मला माझीच लाज वाटली.आपण आपलंच काम डोक्यात ठेवून भेटलो. ते कामात आहेत कि फ्री हा विचारही नाही केला.मग आम्ही चहा पीत मस्त गप्पा मारल्या.मी कविता लिहितो हे ऐकूण त्यांना आनंद झाला. आज पासून आपण मित्र असं म्हणून चहा पिवून आम्ही निरोप घेतला.मी हि एडमिशन घेवून घरी आलो.
वर्ग सुरु झाले होते. सर्व चेहरे नवे .कुणीच ओळखीचं नाही. प्रा.विलास थोरात वर्गावर आले. भाऊसाहेब पगारे नावाचा एक मुलगा बसला होता जवळ तो हळूच कानात म्हणाला,
‘ हे एन.सी.सी.चे आहेत बरका.लई डेंजर आहे.
मी म्हटलं, हे काय असतं एन.सी.सी. ?’
‘ते नाही का लाल तुऱ्याच्या टोपीवाले मुलं. खाकी कपडे घालून परेड करतात ग्राउंडवर.’
चांदवडला नसल्यानं मला ते नव्हतं माहित. तशी मुलं मात्र इथे आवारात पाहिली होती. मी म्हटलं, ‘अच्छा.’
सरांनी सर्वांची ओळख करून घेतली. आणि मराठी विषयाची अभ्यासक्रमाची ओळख करून दिली.
विषय आवडीचा असूनही भाऊसाहेबने सरांची अशी ओळख करून दिल्याने मी गंभीर होवून ऐकत होतो.वर्गात किती मुली बसल्या आहेत हे सुद्धा बघितलं नाही. सर ओळख करून घेत होते तेवढेच फक्त आवाज ऐकलेले. शशी ,हिरा,मीना, सविता. सर्व दरेगावच्या. आश्विनी ,कल्पना या मनमाडच्या. तेवढयात चांदवडचा महेश व्यवहारे आला वर्गात. त्यानेही मराठी विषय घेतला होता. नंतर पंकज गांगुर्डे आणि मंगेश थोरात आला वर्गात. चालु तासाला कुणीही बाहेर जातंय,वर्गात येतंय हा नवीनच प्रकार होता सिनेस्टाईल. शिक्षक शिकवताना डिस्टर्ब होवू नये म्हणून तो असावा बहुदा. तास संपल्यावर मी भाउसाहेबला घेवून थोरात सरांना भेटलो. गप्पा मारल्या. मी म्हटलं, मला एक भित्तीपत्रक हवं मला तिथे काही कविता लेख लावायचेत.ते मला ऑफिस मध्ये घेवून गेले. शिपायाला म्हणाले हा माझा विध्यार्थी आहे याला काही अडचण आली तर मदत कर.आणि दोन नंबरच्या शोकेसची च्यावी त्याला दे. शिपायाने खिळ्याला लावलेली चावी काढून दिली. दुसऱ्या दिवशी गर्दी कमी झाल्यावर भाऊसाहेबला घेवून मी माझ्या काही चित्र कविता आणि वर्तमान पत्रातील लेख तिथे शोकेसमध्ये लावले. च्यावी जिथे होती तिथे ठेऊन निघून गेलो.
दुसऱ्या दिवशी गेटवरच भाऊसाहेब वाट पहात उभा होता.
म्हणला, ‘भो लई हवा झाली.’
म्हटलं कसली ? ‘तो म्हणाला चल तर खरी दाखवतो तुला.’
तो सरळ शोकेस जवळ घेवून गेला. मुला मुलींनी प्रंचंड गर्दी केलेली. जो तो विचारतोय कोण आहे विष्णू थोरे ?
इकडे भाऊची कॉलर टाईट आपल्या मित्राच्या कविता बघताय सर्व म्हणून. तो सांगणार हा बघा विष्णू थोरे तेवढ्यात मी त्याला गप्पं केलं. म्हटलं अशी नको ओळख. शोधू दे मला त्यांना. मग आम्हीच गंमत करायचो. त्या गर्दीत उभं राहून आमच्याच कवितेचं कौतुक करायचो. मग अजून गर्दी व्हायची. मग हळूच तेथून बाजूला जावून आम्ही टाळ्या घेवून हसायचो. कवीला चेहरा नसल्याचा केवढा फायदा असतो. केवढ कुतूहल असतं लोकाना कवी विषयी.
दुसऱ्या दिवशी पाठक सर आले वर्गात. तेव्हा सर्व विषयाची जनरलला मराठी घेतलेली मुलं एकत्र आलेली. वर्ग भरलेला.सरांनी मला पाहिलं.मी हातानेच नमस्कार केला. त्यांनी मान हलवत स्माईल केल. आणि मुलांना म्हणाले तुम्ही फार भाग्यवान आहात.तुमच्या वर्गात एक कवी शिकतोय. मग मला वर्गात उभं करून त्यांनी माझी ओळख करून दिली सर्वाना. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. तास केव्हा संपला कळलं नाही. टाळ्या मात्र एकू येत राहिल्या खूप वेळ.
मधल्या सुट्टीत सर्व माझ्याकडेच बघत असल्याचा शोध भाऊ ने लावला. एका दीपा नावाच्या मुलीनं तर ‘दिसला गम बाई दिसला’ असं ऐकू येईल एवढ्या आवाजात गाणही म्हटलं. मला लाजल्या सारखं झालं. भाऊ ला घेवून मी कॅन्टीनला निघून गेलो. एकात दोन चहा पिलो.
रोज नवे नवे मित्र मैत्रिणी वर्गात येवून भेटत होते.स्वतः ओंळख करून घेत होते. भाऊसाहेबची आणि माझी चांगली दोस्ती झाली. श्रुती जोशी नावाच्या इंग्रजी विषयाच्या मैत्रीनीने तर घरी माझा कार्यक्रमच ठेवला. भाऊसाहेब मला राजदूत गाडीवर घेवून गेला होता. माझा पहिला स्वतंत्र कार्यक्रम. तिच्या घरी चहा सोबत आलेली बिस्किटे खायलाही आम्ही किती लाजलो. शेवटी भाऊ म्हणायचा तू घे आधी आणि मी म्हणायचो आधी तू. शेवटी दोघांनीही नुसताच चहा पिला.बिस्कीट बिचारी आमच्यावर रागावली असतील. दहा पंधरा लोक गोळा करून श्रुतीने माझे कविता वाचन घडवून आणले. सर्वांनी दाद दिली.तिने मला एक डायरीही दिली कविता लिहायला. नवथर वयातल्या कविता लिहून ती डायरी भरलीही. पण ती डायरी मला अविस्मरणीय ठरली. नंतर इंग्रजी विषयाचे संदीप बोडके,राहुल एलींजे, अजय पाटील, योगिता भामरे,सुनिता,शामल,वर्षा,पंचशीला,नीता, मनीषा,रावसाहेब वानखेडे यांच्यासह खूप मित्र भेटले. बी.कॉम चे महेंद्र पगार ,सचिन शिलावट, अरविंद शार्दुल.सचिन देसले, भाग्यश्री व दिपाली सांगळे,शीतल गांगुर्डे. बी.ए. चे नंदू पाटील ,उद्धव चौधरी,संतोष थोरात, शरद शिंदे हे जिवलग माया करणारे दोस्त भेटले. प्रा.संताजी बाविस्कर सरांच्या तासाला सेक्स्पिअरची सुनीतं ऐकायला मी आणि भाऊ जावून बसायचो. इंग्रजी फार समजायचं नाही. मुलं हसली कि आम्हीही हसायचो. इंग्रजीचे वानखेडे सर तर भन्नाट माणूस. या सर्वांनी मला खूप जीव लावला. राजपूत सर,इंगळे सर. ही अजूनही न विसरता येणारी माणसं जपून ठेवली आहेत.
प्रा.डॉ.विलास थोरात यांच्या नावावर खुपदा पुस्तकं घेवून वाचली. कितीतरी पुस्तकं वाचून काढली. एम.ए. लासलगावला गेलो. थोरात सरांचा एक दिवस फोन आला.माझ्या पुस्तकाचं मुखपृष्ठ तुला करायचंय. केवढा आनंद झाला. शीर्षक होतं ‘शरसंधान’. मी आवडीने चार पाच चित्र केली.सरांना सर्वच आवडली.त्यांनी ती गंगाधर पानतावणे सरांना पाठवली त्यांनाही आवडली.एक चित्र निवडलं. पुस्तक छापून आलं.हे माझं पाहिलं मुखपृष्ठ. मी केव्हाही पुस्तक समोर ठेवून ते बघत राहायचो. चुका शोधायचो. आज पाचशेच्या वर पुस्तकांची मुखपृष्ठे केली. मी चित्र काढलेली कितीतरी पुस्तके विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आहेत.ब याचं खरं श्रेय थोरात सरांचं. केवढी उभारी दिली.
कवितेत महाराष्ट्रभर नाव झालं याचं श्रेय माझ्या मनमाड महाविद्यालयाचं आणि इथे भेटलेल्या जिवलग मित्रांचं. याच महाविद्यालयात पारितोषिक वितरणाला प्रमुख पाहुणा म्हणून जाताना केवढा आनंद झाला होता. पण पाहुण्याचा फील आलाच नाही. सारी माझीच माणसं होती पुढ्यात. त्यांच्या डोळ्यातलं कौतुक पाहून मला उगीचच आपण मोठे झालो असं वाटलं. एकात दोन चहा घेणारा भाऊ नव्हता समोर. रोज सकाळी गुडमोर्निग करणारे मित्र नव्हते. मला आवडणारी लायब्ररी मात्र दिमाखात उभी आहे. तिला टाळून मी येथून जावूच नाही शकत.
-विष्णू थोरे, चांदवड. (मो. ९३२५१९७७८१)