नाशिक – नाशिक जिल्ह्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांच्या व्यथा अधिकारी ऐकून घेत नाहीत म्हणून हा शिक्षक दरबार भरवला जातो आणि प्रेमाने ऐकणार नसाल, तर मग बोट वाकडे करावे लागेल या शब्दात शिक्षक आमदार किशोर भाऊ दराडे यांनी शिक्षण विभागातील अधिका-यांना सुनावले. ते नाशिकरोड येथील केजे मेहता हायस्कूल येथे आयोजित शिक्षक दरबार सभेत बोलत होते. सभेला सुरुवात होण्यापूर्वी साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रवीण जोशी यांनी सन्मानपत्र शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला.
या सभेस नाशिक विभाग शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. वैशाली वीर, सहायक शिक्षण उपसंचालक पुष्पलता पाटील, उपशिक्षणाधिकारी अनिल शहारे, कार्यालयीन अधीक्षक सुधीर पगार, वेतन अधीक्षक गणेश फुलसुंदर, उदय देवरे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष गुलाबराव भामरे, कार्यवाह आर. डी. निकम, कार्याध्यक्ष साहेबराव कुटे, समन्वयक व गांवकरीचे उपसंपादक के. के. अहिरे, जळगावचे शिक्षक नेते संभाजी पाटील इ सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी,अपंग संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब सोनवणे, मोहन चकोर,प्रदीप सांगळे, संग्राम करंजकर, निलेश ठाकूर, पुरुषोत्तम रकीबे,त्र्यम्बक मार्तंड,इ सह जिल्हाभरातील पीडित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
आपले प्रश्न मांडताना शिक्षक आक्रमक झालेले दिसून आले.नांदगाव तालुक्यातील पळाशी येथील एका मृत शिक्षकाच्या पत्नीने पतीच्या जागेवर अद्यापही अनुकंपा नियुक्ती बाबत कार्यवाही न झाल्याने तिला आपली कैफियत मांडताना अश्रू आवरणे कठीण गेले. त्यावेळी स्वतः आमदार किशोरभाऊ दराडे भावूक झाले आणि त्यांनी शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी, शिक्षणाधिकारी डॅा. वैशाली वीर यांना याबाबत विचारले असता फेब्रुवारी अखेर कार्यवाही केली जाईल असे शिक्षण उपसंचालक यांनी उत्तर दिले. यावेळी वरिष्ठ व निवडश्रेणी प्रस्ताव, डीएड टू बीएड , विनाअनुदानित मान्यता, मुख्याध्यापक पदोन्नतीमध्ये अपंगाचा अनुशेष भरणे, संवर्ग बदल, सेवाजेष्ठता डावलणे, मुख्याध्यापकाने सर्वोच्च न्यायालय, शिक्षण उपसंचालक कार्यालयातील आदेश न पाळणे, मुख्याध्यापक पेंन्शन, अनुकंपा मान्यता, मेडिकल बिल, रजा रोखीकरण, वेतनपथकाकडून होणारा विलंब, मुख्याध्यापक सह्यांचे अधिकार, इ विषयावर संतप्त पणे शिक्षकांनी आपले प्रश्न मांडले.