नाशिक – पुणे हायवेवर शिंदे गावानजीक असलेल्या शिंदे टोल नाका येथील कर्मचाऱ्यांची मुजोरी कायम असून टोल नाक्यावरून गाडी पास करत असतांना कुरापत काढून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांकडून सद्दाम शेख या ट्रक चालकाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणी ट्रान्सपोर्ट संघटनांनी नाशिकरोड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दाखल करत मुजोर टोल कर्मचारी व प्रशासनाविरोधात कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, शिंदे टोल नाका येथून वाहन चालक सद्दाम शेख हे टोल नाक्यावरून गाडी पास करत असताना कर्मचाऱ्यांच्या अंगावर गाडी घातली अशी कुरापत काढत शेख यांना बेदम मारहाण केल्याची घटना १५ जानेवारी रोजी सायंकाळी घडली आहे. या घटनेचा ट्रान्सपोर्ट संघटनांनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. शेख याना मारहाण झाल्यानंतर टोलवर काम करणाऱ्या अज्ञान कर्मचाऱ्यांविरोधात नाशिकरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या टोल प्रकरणामध्ये पोलीस आयुक्तांनी स्वतः लक्ष घालावे अशी मागणी ट्रान्सपोर्ट संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे गेल्या दोन दिवसांपूर्वी शिंदे टोल नाक्यावरील असुविधां तसेच येथील प्रशासन व कर्मचाऱ्यांच्या मुजोरीबाबत नाशिक ट्रान्सपोर्ट संघटनेच्या वतीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी सुरज मांढरे, पोलीस आयुक्त दीपक पांडे व येथील टोल व्यवस्थापकांना निवेदन देण्यात आले होते. त्यांनतर लगेचच दोन दिवसात पुन्हा एकदा येथील टोलचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. शासनाकडे याबाबत निवेदनाद्वारे मागणी करत दाद मागूनही येथील टोल प्रशासनाची मुजोरी कायम असल्याने नाराजी व्यक्त करत ट्रान्सपोर्ट संघटनांनी या घेतनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणी संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी ट्रान्सपोर्ट संघटनांनी केली आहे.