मुंबई – माजी खासदार धनंजय महाडीक आणि इतर दोन लोकांवर कोव्हीड १९ च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पुण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. २१ फेब्रुवारीला धनंजय महाडीक यांच्या मुलाचे लग्न होते. यात शरद पवार, देवेंद्र फडणवीस, हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांच्यासारखे दिग्गज नेतेदेखील सामील झाले होते.
राज्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असल्यामुळे नागरिकांना सतर्कता पाळण्यासाठी एक आठवड्यांचा अल्टीमेटम मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. अमरावतीत एक आठवड्यांचा कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
पुण्यात नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. नागपुरातील सर्व शाळा बंद करून रात्री ९ ते सकाळी ६ कर्फ्यू लावण्यात आला आहे. पुण्यातील शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस बंद करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत.
अश्यात महाडीक यांनी लग्न सोहळा आयोजित केला आणि तोही मोठ्या थाटामाटात. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण सातत्याने वाढत आहेत. दुसऱ्या लाटेत मृत्यूची मालिकाही सुरू झाली आहे.
महाराष्ट्रातील एकूण कोरोनाग्रसांची संख्या २१ लाखांच्या वर गेली आहे. सोमवारी मुंबईत १ हजार ३६४, विदर्भातील अकोला येथे १ हजार १५४, नागपुरात ७१० रुग्ण आढळले आहेत. राज्यात आतापर्यंत कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंची संख्याही ५१ हजार ८०६ झाली आहे.