नवी दिल्ली : बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असलेला अभिनेता शाहरुख खान आपल्या दिल्लीतील घरी एक दिवस राहण्याची संधी देतो आहे. पण यासाठी तुम्हाला एक स्पर्धा जिंकावी लागेल. शाहरुखची पत्नी गौरी हिने एका ट्रॅव्हल ब्रँड सोबत भागीदारी करून चाहत्यांना ही संधी देऊ केली आहे. तुम्हाला जर एक रात्र या घरात काढायची असेल तर, ‘ओपन आर्म वेलकम’, याचा तुमच्या दृष्टीने अर्थ, महत्त्व काय हे तुम्हाला सांगायचे आहे. योग्य उत्तर देणाऱ्या व्यक्तीला इथे राहण्याची संधी मिळणार आहे. आपल्या दिल्लीच्या घराचा फोटो शेअर करताना शाहरुख खानने म्हटले आहे की, दिल्ली शहराचे माझ्या आयुष्यात एक वेगळेच महत्त्व आहे. इथे गेल्यानंतर माझ्या जुन्या आठवणी नेहमीच ताज्या होतात. एअरबीएनबी सोबत आमच्या घरात आम्ही तुमचे स्वागत करतो. शाहरुखने आपल्या घराचे फोटोजही शेअर केले आहेत. हे घर त्याची पत्नी गौरीने डिझाईन केले आहे. हॉलपासून बेडरूमपर्यंतचे फोटो आपण येथे पाहू शकतो. याशिवाय शाहरुखच्या संपूर्ण कुटुंबाचे फोटोही भिंतीवर पाहायला मिळतात.