मनाली देवरे, नाशिक
कोलकात्ता नाइट रायडर्स संघाने आज राजस्थान रॉयल्सचा ३७ धावांनी पराभव करून फक्त दोन गुणांची कमाईच केली नाही तर नेट रनरेट मध्ये देखील कमालीची सुधारणा करून घेतली. केकेआरच्या १७४ या धावसंख्येला उत्त्तर देण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थान राॕयल्सने ९ खेळाडूंच्या मोबदल्यात अवघ्या १३७ धावा केल्या. एकट्या टाॕम करणची (५४ धावा) झुंज राजस्थान राॕयल्सला पराभवापासून वाचवू शकली नाही.
शाहरुखची उपस्थिती
शाहरुखच्या उपस्थितीमुळे अतिरिक्त बळ मिळाल्यागत आज केकेआरच्या शिवम मावी, कमलेश नागरकोटी आणि वरूण चक्रवर्ती या तीन गोलंदाजांनी केकेआर तर्फे आज जबरदस्त गोलंदाजी केली आणि राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ १३७ धावात गुंडाळून ठेवला. कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मालक आणि सुपरस्टार शाहरुख खान यंदाच्या आयपीएल मध्ये आज प्रथमच आपल्या टीमचा सामना बघण्यासाठी पत्नी गौरी आणि मुलगा आर्यन यांच्यासह स्टेडीअमच्या गॕलरीत बसल्याचे टी.व्ही.वर बघायला मिळाले.
केकेआरचा टीम गेम
शुभमन गिल (४७), सुनील नारायण(१५), नितीश राणा (२२) आंद्रे रसल (२४) माॕर्गन (३४) आणि पॕट कमिन्स (१२), आज कोलकाता नाईट रायडर्सची सगळीच टीम चांगली खेळली. केकेआरचे फलंदाज एक एक करुन बाद होत राहिले, परंतु एक छोटीशी आणि समाधानकारक खेळी करून पॅव्हेलियनमध्ये जाण्यापुर्वी प्रत्येकानेच संघाच्या धावसंख्येला चांगला आकार दिला. २०-२० षटकांच्या झटपट क्रिकेटमध्ये खरेतर असे सांघिक फंलदाजीचे चित्र फार कमी बघायला मिळते. कोणीतरी दोन-तीन फलंदाज दिवस गाजवतात आणि मोठी धावसंख्या उभारतात. परंतु आज कोलकत्याच्या डावात सगळ्यांचाच खारीचा वाटा होता आणि त्यामुळे १७५ धावांचे तगडे आव्हान त्यांना राजस्थान रॉयल्स समोर ठेवता आले.
बुधवारचा सामना
आत्ता पर्यंत प्रत्येकी ३ सामन्यांचा खेळ, त्यात २ पराभव आणि १ विजय. म्हणजे खात्यावर आहेत ३ सामन्यात अवघे २ गुण. गुरुवारी ज्या दोन संघांमध्ये सामना होईल, त्या मुंबई इंडियन्स आणि किंग्स इलेव्हन पंजाब या दोन्ही संघांची ही सारखीच अवस्था आहे. कुणाला तरी पुढे जावेच लागेल, फक्त तो संघ कोणता असेल हे बुधवारी रात्री निश्चित होईल.