नंदुरबार – तीन वर्षांचा असतांना या रस्त्यावरुन सर्वप्रथम शाळेत पायी चाललो होतो. त्यावेळी आम्ही पाच विद्यार्थी २८ किलोमीटरचे अंतर पायी चालायचो. शिक्षण घेतल्यानंतर या रस्त्याचे काम व्हावे अशी इच्छा मनात होती ती आज पूर्ण होत आहे, हे उद्गार आहेत पालकमंत्री ॲड. के सी पाडवी यांचे.
असली ते नकट्यादेव, गोरामाळ, रापापूर, तळोदा हद्दीपर्यंत या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत बनविण्यात येणाऱ्या रस्त्याच्या कामांचे भूमिपूजन करुन स्वप्नपूर्तीचा आनंद मिळाला आहे. शालेय जीवनापासून पाहिलेले रस्त्याचे स्वप्न आज पूर्णत्वास येत आहे, असे प्रतिपादन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांनी केले.
नकट्यादेव येथे असली ते नकट्यादेव, गोरामाळ, रापापूर, तळोदा हद्दीपर्यंत तयार करण्यात येणाऱ्या रस्त्याच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला जि.प.अध्यक्ष सीमा वळवी, जि.प.चे समाज कल्याण सभापती रतनदादा पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, अक्कलकुवा पंचायत समिती सभापती मनिषा वसावे, जि.प.सदस्य प्रताप वसावे आदी उपस्थित होते.










