हर्षल भट, नाशिक
पोषण मूल्य खच्चून भरलेली भगर आता पोषण आहारात येणार आहे. २०२३ पासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. आदिवासी आणि ग्रामीण भागातील भगर हे तृणधान्य यानिमित्ताने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचू शकणार आहे.
नाशिक भगर मिल असोसिएशनचे अध्यक्ष आणि यश ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक महेंद्र छोरिया यांनी सांगितले की, चांगले आरोग्य व पोषण आहारासाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स (आयसीएआर), हैदराबादतर्फे निरनिराळ्या योजना राबवल्या जातात. याअंतर्गत आता २०२३ हे आंतरराष्ट्रीय मिलेट्स (तृणधान्य) वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यानुसार भगरीची निवड करण्यात आली असून पोषण आहारात तिचा समावेश होणार आहे. भगरीसह तृणधान्यांच्या प्रचार आणि प्रसारासाठी नाशिक मधील सोनपरी भगर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलेट्स यांच्यात सामंजस्य करार झाला आहे. यानिमित्ताने नाशकातील उद्योगाची देशपातळीवर दखल घेण्यात आली आहे.
छोरिया म्हणाले की, आयसीएमआर हे सर्वांना चांगले आरोग्य, पोषण आहारासाठी एकत्र येऊन काम करणार आहेत. त्याचबरोबर भगर आरोग्यासाठी उपयुक्त असल्याने लवकरच ती शाळेतील विद्यार्थ्यांनाही मिळू शकणार आहे. संयुक्त राष्ट्र संघाने भारत सरकारच्या प्रस्तावाचे समर्थन केले असून २०२३ ला मिलेटस आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. शरीरासाठी उपयुक्त असलेल्या भगरीचा प्रचार व प्रसार व्हावा असेच शेतकऱ्यांना यातून आर्थिक उत्पन्न मिळावे यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. त्यानुषंगाने आता पोषण आहारात भगरीचा समावेश करण्यात येणार आहे. आदिवासी भागातील पिकाला ओळख मिळावी तसेच संबंधित शेतकऱ्यांचा विकास व्हावा यादृष्टीने शहरातील पावले साकारात्मक पडत असल्याचे दिसते आहे. नाशिकच्या उद्योगासोबत राष्ट्रीय प्रचार-प्रसाराचा करार झाल्याने यानिमित्ताने नाशिक शहराचे नावही उंचावले गेले आहे.
भगरीचे फायदे
भगर ही प्रामुख्याने उपवासाचा पदार्थ म्हणून ओळखली जाते. पोषण आहारात तिचा समावेश झाल्यास भगरीतील पोषक तत्वे अधिकाधिक जणांना मिळणार आहेत. ग्लुटेन फ्री तसेच शरीराला ऊर्जा आणि पोषण देणारी म्हणून भगरीचे महत्व आहे. तसेच, आदिवासी आणि ग्रामीण भागात तिचे उत्पादन होते. स्थूलपणा, मधुमेह, रक्तदाब यासह विविध वाढत्या आरोग्य तक्रारींमुळे भगरीला सपंती दिली जात आहे. त्यामुळे पूर्वी गरिबांचे खाद्य पदार्थ असलेली भगर ही आता श्रीमंतांच्या डाएट प्लॅनचा भाग झाल्याचे छोरिया यांनी सांगितले आहे.