चांदवड – शालेय शिक्षण घेत असतांना शिक्षकांप्रती असलेला आदर, सद्भावना व्यक्त कारण्याची पद्धत आपल्याकडे आहेच. परंतु, गरिबीतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना परिस्थिती आणि शिक्षणाची तळमळ निराळीच असते. याच धर्तीवर चांदवड येथील कुंदलगावच्या देविदास चौधरी यांनी गावातील विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरु केली आहे. शाळेच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम नुकताच पार पडला असून चौधरी यांचे शिक्षक केदा मोरे (मोरे गुरुजी) यांच्या हस्ते करण्यात आले. या निमिताने शिक्षकांप्रती असलेला आदरभाव पुन्हा एकदा दिसून आला आहे.
ज्ञानगंगा शिक्षण प्रसारण मंडळ, कुंदलगाव, ता. चांदवड येथे मोरे गुरुजींच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला. शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देत असतात. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकांचा मोठा वाटा असतो. विद्यार्थी देखील त्याच आत्मीयतेने शिक्षकांचे संस्कार जपण्याचा प्रयत्न आयुष्यभर करत असतात. असाच प्रयत्न चौधरी यांनी केला आहे. ज्या शिक्षकांकडून शाळेचे धडे घेतले त्याच शिक्षकांच्या हस्ते नव्याने उभारल्या जाणाऱ्या शाळेचे भूमिपूजन केले. त्यामुळे त्यांच्या कार्याचे सध्या कौतुक होत आहे. मोरे गुरुजींनी शिक्षक पेशात असतांना हलाखीच्या परिस्थितीतही त्यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना ज्ञानदानाचे कार्य केले. आयुष्यात शिक्षण महत्वाचे असून त्याद्वारे परिस्थितीवर देखील मात करता येते असे मत यावेळी मोरे गुरुजींनी व्यक्त केले. कोणत्याही इमारतीचा पाया जर भक्कम असेल तरचं त्यावर मजले बांधता येतात त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या बाबतीत प्राथमिक शिक्षण दर्जेदार असेल तर पुढील शिक्षणात कोणताच अडथळा येत नाही असे ते म्हणाले. यावेळी अनेक मान्यवरांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
—
गुरुजींमुळेच आम्ही घडलो. त्यांच्यामुळेच खरे तर आम्ही आहोत. त्यांच्या हस्तेच शाळेच्या कामाचे भूमीपूजन व्हावे याहून मोठे सत्कार्य काय असू शकते. मोरे गुरुजींच्या हस्ते भूमीपूजन झाले. आम्ही सर्व नशिबवान आहोत.
- देवीदास चौधरी, निवृत्त उपजिल्हाधिकारी
Very nice
आकाशाला गवसणी घालण्याची प्रचंड शक्ती बालवयात ज्यांनी रुजवली त्या गुरुजनांचे प्रति ऋणमुक्त होण्याकरिता ज्ञान मंदिराचे आपल्या गुरूंच्या हस्ते नवीन नवीन शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन हे खऱ्या अर्थाने उत्तम शिष्याचे समर्पक उदाहरण होय. विश्वातील तमाम गुरुजनाना प्रति आदर्श उदाहरण. सार्थ अभिमान
धन्यवाद!!