हर्षल भट, नाशिक
लॉकडाऊनमुळे नाट्यगृह बंद असल्याने कलाकारांचा हिरमोड झाला आहे. प्रत्यक्ष रंगमंचावर नाटक सादर करणे तूर्तास शक्य नाही. ही बाब लक्षात घेऊन नाशिकच्या प्रथमेश जाधवने घराच्या टेरेसवर थेट खुलारंगमंचच साकारण्याची किमया केली आहे. मुंबई, पुणे येथील कलाकारांना शक्य झाले नाही ते नाशिकच्या कलाकाराने करून दाखवले आहे. या खुल्या रंगमंचावर ‘चित्तरकथा’ नाटकाचा प्रयोगही नुकताच पार पडला आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि त्या पार्श्वभूमीवर राज्यातील बंद असलेले नाट्यगृह उघडण्याची शक्यता नसल्याने प्रथमेशने अनोखी संकल्पना शोधून काढली. खुला रंगमंच संकल्पना नवी नाही परंतु, कोरोनाच्या काळात राहत्या घराच्या टेरेसवर रंगमंच उभारल्याने त्याचे विशेष कौतुक होत आहे. केवळ नाशिकच्या कलावंतांपुरतेच मर्यादित न राहता हे हक्काचे व्यासपीठ आता राज्यभरातील कलाकारांसाठी देखील उपलब्ध करण्यात आले आहे.
असा साकारला रंगमंच
सक्तीने मिळालेल्या या मोकळ्या वेळात प्रथमेशने टाकाऊ वस्तूंपासून रंगमंच उभारला आहे.कुटुंबातील सर्वांनी त्याच्या कामाला सहकार्य करत अल्पावधीत खुला रंगमंच साकार केला. बांबू आणि पडद्याच्या सहाय्याने या रंगमंचाची उभारणी केली गेली आहे. या रंगमंचाला विंग आहेत तसेच एक आरसा असलेली ग्रीन रुम देखील तयार करण्यात आली आहे. प्रकाश योजनेसाठी तर प्रथमेशने थेट धान्य मोजावयाचे मापच उपयोगात आणले आहे. हा ‘खुला’ रंगमंच वाद्य वादन, गीत गायन, कथा वाचन, न्रूत्य, नाट्यछटा तथा नाटक अशा सर्वच कलांच्या सादरीकरणासाठी ‘खुला’ ठेवण्यात आला आहे.
स्नेह पुणे या संस्थेतर्फे ‘चित्तरकथा’ नाटकाचा प्रयोग पार पडला. रंगमंच जरी खुला असला तरी सरकारी नियमांचे पूर्णपणे पालन करून प्रयोग सादर करण्यात आला. शांताबाई कृष्णाजी कांबळे यांच्या आत्मवृत्तावर आधारित हे नाटक असून दिग्दर्शन योगेश सोमण यांनी केले आहे. मंजू गंगावणे आणि मुक्ता वळसे यांनी अभिनय केला. प्रसाद खडके यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम पाहिले आहे. नाममात्र नेपथ्य, साजेशी वेशभूषा, समर्पक पार्श्वसंगीत आणि प्रकाश योजना यांसह खुल्या रंगमंचावरील कलाकृतीला रसिकांची दाद मिळाली.
—
नाट्यगृह बंद असल्याने नाटक थांबता कामा नये यासाठी खुला रंगमंच साकारण्याचे ठरवले. अर्थातच परिवारातील सर्वांची मदत मिळाली. टाकाऊ वस्तूंपासून रंगमंच उभारण्यात आला आहे. घरच्या टेरेसवर प्रथमच नाशिकमध्ये खुल्या रंगमंचाचा प्रयोग सादर करण्यात आल्याचे समाधान आहे.
– प्रथमेश जाधव, रंगकर्मी
– प्रथमेश जाधव, रंगकर्मी
It’s Prasad khadake
Mukta Walse