नाशिक – गाड्यांचे चित्र गोळा करणे वा खेळण्यातल्या गाड्या गोळा करणे असे विविधांगी छंद लहान मुलांना असतात. परंतु सातवीच्या वर्गात शिकणारा कुणाल चक्क नावाजलेल्या कंपन्यांच्या गाड्यांचे डिझाईन साकारतो आहे. त्यामुळेच सोशल मिडीयावर तो अनेकांच्या पसंतीस उतरला आहे.
फोर व्हिलर व टू व्हिलर गाड्यांचे डिझाईन अतिशय आकर्षक पद्धतीने साकारण्याचे कसब कुणालने अंगिकारले आहे. तसेच शेतीसाठी आवश्यक समजल्या जाणारे ट्रॅक्टर तसेच मालवाहतुकीसाठी वापरले जाणाऱ्या पिक अप गाड्यांचे डिझाईन तो घरच्या घरी तयार करतो. घरच्या घरी कुणालने ही कला अवगत केली आहे. सातवीत शिकणार कुणाल दिंडोरी तालुक्यातील उमराळे येथील आहे. लहान वयात त्याने घरगुती साहित्यातून गाड्यांचे डिझाइन तयार करण्याची कला अंगिकारली आहे. कोणत्याही खर्चाविना घरगुती साहित्य वापरून कुणाल गाड्यांचे डिझाइन तयार करतो. केवळ पुठ्ठा आणि डिंक या दोनच साहित्यांच्या साहाय्याने मोटारसायकल, रेसिंग गाड्यांचे डिझाइन त्याने तयार केले आहे. देशात ‘स्किल इंडिया’ची पायाभरणी करण्यासाठी नवनवीन शोध समोर येत असतांना नाशिकच्या कुणालचाही यात हातभार लागतो आहे. शाळकरी विद्यार्थी ‘आत्मनिर्भर’ होण्याकडे पाऊल टाकत असल्याने सक्षम विद्यार्थी घडण्यास मदत होते आहे. त्याने तयार केलेल्या गाड्यांच्या फोटोंना सोशल मीडियावर भरभरून प्रतिसाद मिळतो आहे.
 
 
 
			







