जळगाव – शहरातील मुलेच उच्च अधिकारी होवू शकतात असा आजवर समज होता. परंतु कांतीलाल सुभाष पाटील या काळ्या आईची सेवा करणाऱ्या शेतकऱ्याच्या मुलाने, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकून आणि कोणताही क्लास न लावत युपीएससी उत्तीर्ण होऊन हा समज खोडून काढला आहे. शेतकऱ्याचा मुलगाही आयएएस होऊ शकतो, हे दाखवून शेतकरी कष्टाच्या घामासोबत संस्काराचे मोतीही पिकवतो असा आत्मविश्वास त्यांनी समाजाला दिला असल्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कांतीलाल पाटील यांच्या सत्काराप्रसंगी काढले.
भुसावळ तालुक्यातील तपत कठोरा येथील कांतीलाल सुभाष पाटील या तरूणाने यंदाच्या युपीएससी परिक्षेत यश संपादन केले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आज त्याचा हृदय सत्कार केला. याप्रसंगी त्यांचे वडील सुभाष पाटील, भुसावळचे नगरसेवक मनोज बियाणी व सामाजिक कार्यकर्ते राजू पारख यांची उपस्थिती होती.
कौतुक करावे तेवढे कमी
याप्रसंगी गुलाबराव पाटील यांनी कांतीलाल पाटील यांचे कौतुक केले. ते म्हणाले की, आमचे जुने सहकारी तथा जुने शिवसैनिक सुभाष पाटील यांच्या चिरंजीवांनी मिळवलेले यश हे अतिशय अभिमानास्पद आहे. खरं तर शहरातील मुलेच उच्च अधिकारी होऊ शकतात असे मानले जाते. पण शेतकऱ्याचा मुलगा, जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतलेला व कोणतेही क्लास न लावता यश संपादन केलेल्या कांतीलाल यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. जिल्ह्यातील तरूणांनी याचा आदर्श घेण्याची आवश्यकता आहे. पाटील म्हणाले की, कांतीलाल यांनी या पदाच्या माध्यमातून देशसेवा करीत असताना आपल्या मूळ गावाचा व संस्कृतीचा विसर पडू देवू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. या कुटुंबाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद असल्याचे नमूद करत गुलाबराव पाटील यांनी कांतीलाल पाटील यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.