ग्रामीण भागातील टपाल व्यवहारांचे जाळे विस्तारण्यासाठी तसेच देशातील बहुसंख्य गावांत अल्पबचत योजनांची सुविधा उपलब्ध करण्यासाठी,टपाल खात्याच्या अल्पबचत योजना आता शाखानिहाय टपाल कार्यालयात सुरू होणार आहेत.
ग्रामीण भागात १ लाख ३१ हजार ११३ टपाल कार्यालये कार्यरत आहेत. पत्रे, स्पीडपोस्ट, पार्सल, ईलेक्ट्रानिक मनीआँर्डर, ग्रामीण पोस्टल जीवनविमा या नेहमीच्या सुविधांसह, टपालखात्यांच्या कार्यालयांतून पोस्ट ऑफिस बचत खाते, रिकरिंग खाते, मुदतठेवी, सुकन्या सम्रुध्दी खाते या सुविधा देखील पुरवल्या जातात.
नव्या आदेशानुसार शाखानिहाय टपाल कार्यालये आता सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी(PPF), मासिक आय योजना(monthly income scheme), राष्ट्रीय अल्पबचत योजना, किसान विकास पत्र, वरीष्ठ नागरिक बचत योजना या योजनांची कार्यवाही करू शकतील. ग्रामीण भागातील नागरिकांना देखील शहरातील नागरिकांप्रमाणेच सर्व सुविधांचा लाभ होईल.ग्रामीण भागातील नागरीक आपल्या गावातील टपाल कार्यालयातच या लोकप्रिय योजनांअंतर्गत आपल्या बचतीची गुंतवणूक करू शकतील. पोस्टाच्या सर्व बचत योजना लोकांपर्यंत आणून, ग्रामीण भारताचे सक्षमीकरण करण्यासाठी, उचललेले हे आणखी एक पाऊल आहे.