शाकंभरी देवी नवरात्र महात्म्य
पौष शुद्ध अष्टमी म्हणजेच २१ जानेवारीपासून शाकंभरी देवी नवरात्र उत्सव प्रारंभ होत आहे. पौष पौर्णिमा म्हणजे २८ जानेवारीपर्यंत हा उत्सव असणार आहे. या नवरात्र उत्सवाला गुप्त नवरात्र असेही म्हटले जाते.
शाकंभरी देवीची कथा
दुर्गम नावाच्या राक्षसाने तपश्चर्येने ब्रह्मदेवाकडून अमरत्वाचा वर मागून घेतला होता. त्यामुळे पृथ्वीवरील अखिल मानव जातीला तो त्रासदायक ठरला होता. या दुर्गम राक्षसाने पृथ्वीवरील सर्व निसर्ग सृष्टी तसेच अन्नधान्य नष्ट केले होते. देवी-देवतांना देखील या दुर्गम राक्षसाने त्राहिमाम् करून सोडले होते. त्याच्या या त्रासापासून मुक्त होण्यासाठी सर्व देवता गण कैलास पर्वतावर पार्वतीला शरण गेले आणि राक्षसापासून सुटका करण्याची विनंती केली. त्यावेळी पार्वतीने देवी दुर्गाचे रूप असलेल्या शाकंभरी देवी रूपात प्रकट होऊन दुर्गम राक्षसाचा नाश केला. पृथ्वीवरील सर्व निसर्ग सृष्टी व अन्नधान्य, भाजीपाला म्हणजेच शाक पुन्हा निर्माण केला. या निसर्ग निर्माणाची सुरुवात राजस्थानातील सांभर या ठिकाणाहून देवीने केल्याने शाकंभरी असे नाव पडले, अशी पौराणिक कथा आहे. यावरून या देवीस शाकंभरी नाव पडले.
देवीला अन्नपूर्णा देखील म्हटले जाते. या देवीच्या नवरात्र उत्सवात अन्नदान केल्याने तसेच शाकंभरी देवीची नियमित भक्ति केल्याने घरामध्ये अन्नधान्याची कमी होत नाही, अशी मान्यता आहे. भारतभर भक्तपरिवार असलेल्या शाकंभरी देवीची तीन शक्तीपीठे देशात आहेत. या नवरात्रोत्सवात सर्व ठिकाणी देवी दर्शनासाठी भक्तांची गर्दी असते.
साडेतीन शक्तीपीठे
पहिले शक्तिपीठ राजस्थान मधील सिकर येथे आहे. येथे या देवीला सकराय माता म्हणून ओळखले जाते. दुसरे शक्तिपीठ राजस्थानमधील जयपूर जवळील सांभर येथे आहे. तिसरे शक्तिपीठ उत्तर प्रदेशातील मेरठ जवळील सहारनपूर येथे आहे. महाराष्ट्रात देखील शाकंभरी देवीचा मोठा भक्त परिवार आहे. या सर्व भक्तांच्या घरी शाकंभरी देवी नवरात्र मोठ्या थाटामाटात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन साजरे केले जाते. यामध्ये नऊ दिवस देवी पूजन, देवीची प्रातः आरती, सायं आरती, देवीस दोन्ही वेळचा नैवेद्य, भक्त मंडळी नऊ दिवसाचे उपवास करतात. अखंड नंदादीप लावला जातो. शाकंभरी देवी महात्म्य, स्तोत्र, दुर्गा सप्तशती पाठ, अन्नपूर्णा स्तोत्र, अखंड पठण केले जाते. तसेच नवरात्र समाप्तीच्या दिवशी देवीची महाआरती, महानैवेद्य व महाप्रसाद वाटप अशा धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. देवीला केलेले नवस या काळात फेडले जातात.
दिवाळी पूर्वीच्या शारदीय नवरात्र उत्सवा प्रमाणेच शाकंभरी देवीच्या नवरात्रोत्सवात देखील सर्व प्रकारचे धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन नऊ दिवस केलेले असते.