नाशिक – अंबड परिसरातील शांती नगर झोपडपट्टी जवळील डोंगराला आग लागल्याची दुर्घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली आहे. अज्ञात व्यक्तीने सिगारेट किंवा विडीचे थोटके टाकल्याने ही आग पसरल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळविण्यात वन विभागाला यश आले आहे.
वनविभाग आणि महापालिका अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अंबड औद्योगिक परिसरातील शांती नगर झोपडपट्टीच्या पाठीमागे असलेल्या डोंगराला शनिवारी सायंकाळी अचानक आग लागल्याने वन विभाग व अग्निशमन दलाची चांगलीच धावपळ उडाली.
अग्निशमन दलाचे बंब आगी पर्यंत पोहोचू न शकल्याने त्यांना रिकाम्या हाताने परत फिरावे लागले. तर वन विभागाच्या अधिकारी-कर्मचारी वर्गाने तेथील झाडाच्या फांद्यानी आग विझविण्याचा प्रयत्न केला असता त्यांना काही प्रमाणात यश आले. सुदैवाने ही आग जर झोपडपट्टी पर्यंत पोहोचली असती तर मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता येथील नागरिकांनी वर्तविली.
परिसरातील काही गर्दुल्ले डोंगर परिसरात फिरायला गेले असता त्यांनी धूम्रपान करून अथवा सिगारेट फेकल्यामुळे आग लागण्याची शक्यता वनपाल दीपक बोरसे यांनी व्यक्त केली. नाशिक मध्ये गेल्या काही दिवसांपासून परिसरातील डोंगर परिसरात आग लागण्याच्या घटना वारंवार घडत असूनही यावर ठोस अशी उपाययोजना वन विभागाकडून होताना दिसत नसल्याने वन प्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, या आगीत वनसंपत्ती आणि जैविक विविधतेचे मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे.