नरेश हाळणोर
नाशिक : कोरोना विषाणूविरोधात पोलीस दलाचा लढा सुरु असताना राज्यातील ५७ पोलीस कोरोनामुळे मृत झाले आहेत. यात नाशिक ग्रामीण पोलीस दलातील तिघे तर शहरातील एकाचा समावेश आहे तर आजमितीला नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील २३ पोलिसांना कोरोनाची लागण झालेली आहे. शहरभर कोरोनाचे रुग्ण वाढलेले असताना पोलीस ठाणेही यापासून सुटलेले नाहीत. मात्र यामुळे शहर पोलिसांमध्ये काहीसे चिंतेचे वातावरण आहे.
नाशिक शहराचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याच्या दृष्टीकोनातून ठोस उपाययोजना केल्या. च्यवनप्राश पासून स्यानिटायझर, मास्क, आर्सेनिकच्या गोळ्या, गरम पाणी, काढा यासारखे उपाययोजना राबून ते पोलिसांपर्यंत पोहीचविले.
परिणामी, अलीकडे पर्यंत शहर पोलिसात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. त्याचवेळी नाशिक ग्रामीणचे पोलीस मालेगावात बंदोबस्तवर असताना मोठ्या संख्येने बाधित झाले होते.
दरम्यान, नाशिक शहरात गेल्या दीड महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या संख्येने वाढला. सध्या त्याचा फैलावही तीव्र गतीने होतो आहे. शहरात त्यामुळे प्रतिबंधक क्षेत्र वाढले आहे. त्याठिकाणी पोलीस बंदोबस्त आहे. परिणामी, कोरोनाने शहर पोलिसात शिरकाव केला असून आजमितीस २३ पोलीसांना कोरोनाची लागण झाली आहे. तर, काही पोलीस ठाण्यात कोरोनाची लागण असलेले पोलिसही दिवसेंदिवस लक्षणीयरीत्या वाढत आहेत. ही बाब पोलिसांमध्ये काहीशी चिंता वाढविणारी ठरते आहे.