मुंबई – राज्यात सध्या औरंगाबाद शहराचे संभाजीनगर आणि उस्मानाबाद शहराचे धाराशीव हे नामांतर गाजत आहे. यासंदर्भात शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री कार्यालय (सीएमओ) कडून या शहरांचा उल्लेख औरंगाबाद-संभाजीनगर आणि उस्मानाबाद-धाराशीव असा केला जात आहे. यासंदर्भात काँग्रेसने कडाडून विरोध केला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उघडपणे यावर नाराजी व्यक्त केली. त्यामुळे महाविकास आघाडीत मतभेद असल्याचे स्पष्ट झाले. आता या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेकडे अनेकांचे लक्ष होते. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना यासंदर्भात विचारले असता त्यांनी यावर भाष्य केले आहे. पवार म्हणाले की, आमच्यात कुठलेही मतभेद नसून, या विषयाकडे मी गांभिर्याने पहात नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भातील ठाम भूमिका यापूर्वी मांडली आहे. औरंगजेब हा काही सेक्युलर नव्हता असे उद्धव यांनी यापूर्वीच म्हटले आहे. तर, शहरांचे नामांतर करुन विकास होत नसल्याचे काँग्रेसने म्हटले आहे, शिवाय आमच्या किमान समायिक कार्यक्रमात नामांतराचा मुद्दाही नसल्याचे थोरात यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नामांतराचा मुद्दा सध्या राज्यभरात गाजत आहे.