सोनसाखळ्या हिसकवण्याच्या दोन घटना
नाशिक – शहरात भरधाव दुचाकीवरुन येत सोनसाखळ्या हिसकावण्याचे प्रकार वाढले आहेत. शनिवारी विविध दोन ठिकाणी सोनसाखळया हिसकवण्याचे प्रकार घडले.
पहिला प्रकार विनयनगर बसस्टॉप परिसरात घडला. याप्रकरणी शोभा राजेंद्र नागरे (रा. भारतनगर) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार नागरे या विनयनगर बसस्टॉप पासून पायी जात होत्या. त्याचवेळी समोरून काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन दोन जण आले. दोघांपैकी एकाने त्यांची ६० हजार रुपये किंमतीचे गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरिक्षक चेतन मार्तंड करत आहेत.
दुसरी घटना इंदिरानगरला गुरूगोविंदसिंग कॉलेज परिसरात घडली. या प्रकरणी विजय पुंजा रावरिया (२१, रा. वडाळा-पाथर्डीरोड, इंदिरानगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. रावरिया आपल्या मित्रा समवेत गुरूगोविंदसिंग कॉलेज रोडने पायी चालत होत्या. त्याचवेळी काळ्या रंगाच्या सीबीझेड या दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने त्याच्या गळ्यातील ७० हजार रूपये किंमतीची सोन्याची चैन हिसकावून पळ काढला. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास उपनिरिक्षक जे.जी. शेख हे करत आहेत.
—
मारहाण करत लाखाचे मोबाईल लुटले
नाशिक – रस्त्याच्या कडेला उभ्या चारचाकी गाडीत घुसण्याच्या प्रयत्न एका व्यक्तीने केला. त्यास विरोध झाल्याने दगडाने मारहाण करत लाख रुपयांचे तीन मोबाईल एकाने जबरदस्तीने लांबवल्याचा प्रकार उपनगर नाका परिसरात शुक्रवारी (दि.२६) सकाळी घडला.
रवी बाळू दिवे (१९, रा. अम्रपाली झोपडपट्टी, जेलरोड) असे लुटमार करणार्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी कैलास नानिकराम रोहिरा (रा. शांती पार्क, उपनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, रोहिरा हे शुक्रवारी सकाळी उपनगर नाका परिसरातील इच्छामणी लॉन्सजवळ चारचाकी थांबवून फोनवर बोलत होते. त्याचवेळी अचानक रवी दिवे त्याठिकाणी आला. तो चारचाकी वाहनात बळजबरी घुसण्याचा प्रयत्न करत असताना राहिरा यांनी विरोध केला. यामुळे दिवे याने दगडाने रोहिरा यांना मारहाण करत गाडीतील त्यांच्या जवळील महागडे तीन मोबाईल जबरदस्तीने घेऊन गेला. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीसांनी दिवे यास अटक केली आहे. अधिक तपास उपनिरिक्षक व्ही.एस. लोंढे करत आहेत.